माणसे घडविणारे चालते-बोलते विद्यापीठः संत भगवानबाबा

बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील सुपे सावरगाव येथे २९ जुलै १८९६ रोजी भगवानबाबांचा जन्म झाला. विसाव्या शतकातील होऊन गेलेले एक महान संत म्हणून संत भगवानबाबा यांना ओळखले जाते. अशा या भगवानबाबांची राहणी अत्यंत साधी व उच्च विचारसरणी होती. त्यांनी आयुष्यभर अंधश्रध्दा, जातीयता, व्यसन आणि अज्ञानाच्या विरोधात लढा दिला आणि समाजाला विकासाच्या मार्गावर आणण्याचे महत कार्य केले.

लहानपणापासूनच भगवानबाबांनी शालेय शिक्षण घेता-घेता शेतामध्ये जाऊन गुरं-ढोरं राखण्याचे कामही केले. घरचे वातावरण धार्मिक असल्याने लहानपणीच त्यांना अध्यात्माची गोडी लागली. कालांतराने नारायणगडावरील आध्यात्मिक केंद्राचे महंत श्री माणिकबाबा यांचेकडून भगवानबाबांनी दीक्षा घेतली आणि पुढील शिक्षणासाठी ते आळंदीला गेले. तिथेच त्यांनी अध्यात्म आणि शिक्षणाचे धडे घेऊन नारायणगडावर परत आले. त्यावेळी त्यांचे वय अवघे २१ वर्ष होते. त्यानंतर भगवानबाबा नारायणगडाचे महंत झाले व तेथे त्यांनी अनेक धार्मिक उपक्रम राबवले. त्याचबरोबर त्यांनी गडसंवर्धनाचे कामही केले. गडावर असताना त्यांनी भाविकांच्या आग्रहास्तव कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्यही केले. एक प्रकारे समाजाला अंधकारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग त्यांनी दाखविला. पण त्यांनी आपल्या श्रध्दा व मुल्यांशी कधीही तडजोड केली नाही. अशा प्रकारे आयुष्यभर भगवानबाबांनी भक्तिमार्ग प्रसाराबरोबरच जनकल्याणाचेही कार्य चालू ठेवले. असे हे भगवानबाबा माणसांचे प्रमुख आधारस्तंभ तर वारकरी संप्रदायाचे तारणहार होते.

अखेरीस त्यांनी वयाच्या ६९ व्या वर्षी समाधीस्थ होऊन जगाचा निरोप घेतला. आजही श्रीक्षेत्र भगवानगडावरील भगवानबाबा यांची समाधी असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान आहे.

Share