आधुनिक महाराष्ट्राचे महिपती श्री दासगणू महाराज

श्री साईबाबा, श्री गजानन महाराज यांसारख्या थोर संतांचे चरित्र आपल्या लिखाणातून जनमानसांपर्यंत पोहचविणारे संत म्हणजेच आधुनिक महाराष्ट्राचे महिपती श्री दासगणू महाराज. ते कवी तसेच कीर्तनकार देखील होते.

६ जानेवारी १८६८ रोजी उमरी (जि.नांदेड) येथे त्यांचा जन्म झाला. (काही ठिकाणी त्यांचा जन्म १८६७ साली अकोळनेर, अहमदनगर येथे झाल्याचा उल्लेख आढळतो.) लहानपणापासूनच ते धार्मिक वृत्तीचे होते. तरुणपणी त्यांना पोलिस खात्यामध्ये नोकरी लागली. पोलिस खात्यात नोकरी करत असताना एके दिवशी एका कुख्यात गुंडाला पकडण्याच्या मोहिमेवर असताना त्यांचेवर त्या गुंडांच्या टोळीने प्राणघातक हल्ला केला, पण ते या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. तेव्हा त्यांना असे जाणवले की, केवळ देवानेच त्यांना जीवनदान दिले. तेव्हापासून त्यांनी आपले संपूर्ण जीवन हे देवभक्तीसाठी अर्पण केले.

दासगणू महाराज हे साईबाबांचे परमभक्त म्हणून ओळखले जातात. साईबाबांची ‘शिर्डी माझे पंढरपूर’ ही आरती देखील दासगणू महाराजांनी लिहिली. पुढे लिखाण सुरू केलेवर त्यांचे अनेक अभंगांमध्ये साईबाबांचा वारंवार उल्लेख आढळतो. दासगणू महाराज हे साईबाबा संस्थानचे पहिले अध्यक्ष देखील होते. दासगणू महाराज हे साईबाबांबरोबरच श्री गजानन महाराजांचे देखील भक्त होते. आज श्री गजानन महाराजांचे भक्त श्री दासगणू महाराज लिखित ‘श्री गजाननविजय’ या ग्रंथाचे नियमित पारायण करत असतात. दासगणू महाराजांनी साईस्तवमंजिरी, संत कथामृत, शिर्डी माझे पंढरपूर, शंकराचार्य चरित्र, भावदीपिका, भक्तीसारामृत, भक्तलीलामृत, गोदामाहात्म्य, आऊबाई चरित्र, ईशावास्य भावार्थ बोधिनी यांसारखे अनेक प्रसिध्द ग्रंथ लिहिले आहेत.

या थोर संताने वयाच्या ९५ व्या वर्षी पंढरपूर येथे १९६२ साली प्राणत्याग केला. दासगणू महाराजांची समाधी नांदेड येथील गोरटा या ठिकाणी आहे.

Share