आद्यक्रांतिवीर नरवीर उमाजीराजे नाईक

उमाजीराजे नाईक यांचा जन्म रामोशी-बेरड समाजात लक्ष्मीबाई व दादोजी खोमणे यांच्या पोटी 7 सप्टेंबर 1791 रोजी पुणे जिल्ह्यातील किल्ले पुरंदर या ठिकाणी झाला. उमाजी नाईक यांचे वडील दादोजी खोमणे हे पुरंदर किल्ल्याचे वतनदार होते. त्यामुळे उमाजीराजेंचे कुटुंब पुरंदर व वज्रगड किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडत होते. त्यामुळेच त्यांना नाईक ही पदवी मिळाली होती.

उमाजीराजे लहानपणापासूनच हुशार, चंचल, शरीराने धडधाकट, उंचेपुरे आणि करारी होते. त्यांनी पारंपरिक रामोशी हेर ही कला आत्मसात केली होती. जसजसे उमाजीराजे मोठे होत गेले. तसतसे त्यांनी वडील दादोजी नाईक यांचेकडून दांडपट्टा, तलवार, भाला, कु-हाडी, तीरकमठा, गोफण वगैरे चालविण्याची कला अवगत केली.

इ.स.1803 मध्ये इंग्रजांकरवी दुस-या बाजीराव पेशव्याने सर्वप्रथम पुरंदर किल्ल्याच्या वतनदारीचे व संरक्षणाचे काम रामोशी समाजाकडून काढून घेऊन आपल्या मर्जीतील लोकांकडे दिले. त्यामुळे रामोशी समाजावर उपासमारीची वेळ आली व अत्याचार वाढू लागले. अशा परिस्थितीत उमाजीराजे यांनी ‘माझ्या देशावर परकियांना राज्य करू देणार नाही’ असा पण करत इंग्रजांविरूद्ध बंड पुकारले. उमाजीराजे देशासाठी लढत असल्याने जनताही त्यांना साथ देऊ लागली आणि इंग्रज मेटाकुटीला आले. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरूद्ध लढणारे महाराष्ट्रातील हे प्रथम आद्यक्रांतिकारक होते.

3 फेब्रुवारी हा या आद्यक्रांतिकारकाचा स्मृतिदिन. ‘मरावे परि क्रांतिरूपे उरावे’ अशी उक्ती उमाजीराजे यांच्याबद्दल तंतोतंत जुळते. ते ख-या अर्थाने स्वतःच्या कार्याने एक दीपास्तंभच ठरले आहेत. त्यांचा गौरव करण्यापासून इंग्रज अधिकारीही स्वतःला रोखू शकले नाहीत. अशा या थोर आद्यक्रांतिकारक उमाजीराजेंचा राज्याभिषेक २२ जुलै, 1826 साली कडेपठार, जेजुरी या ठिकाणी करण्यात आला.

उमाजीराजेंनी 16 फेब्रुवारी, 1831 रोजी इंग्रजी सत्तेविरूद्ध जो जाहीरनामा प्रसिद्ध केला, तो संपूर्ण क्रांतिकारकांच्या इतिहासात सोनेरी पानच ठरला. त्यामुळेच उमाजीराजे हे आद्यक्रांतिकारक म्हणून ओळखू लागले. तेंव्हापासून उमाजी हे जनतेचे राजे बनले. देशासाठी फासावर जाणारे पहिले नरवीर उमाजीराजे नाईक 3 फेब्रुवारी, 1832 रोजी पुण्याच्या खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत वयाच्या 43 व्या वर्षी हसत-हसत फासावर चढले. अशा या धाडसी उमाजीराजेंचा लढा वर्षानुवर्षे प्रेरणा देत राहील.

Share