‘नवचैतन्याचा गुढीपाडवा’

गुढीपाडवा हा हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी महत्त्वाचा एक सण असून हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा करण्याची परंपरा आहे. हा पाडवा म्हणजे प्रतिपदा आणि या दिवशी गुढी किंवा ब्रह्मध्वज उभारणे हे आनंद आणि विजयाचे प्रतीक आहे. त्यामुळे या दिवशी नवीन कामाचा अथवा कार्याचा शुभारंभ केला जातो.

या दिवशी प्रत्येक जण आपल्या घराच्या प्रवेशद्वारी उंचावर गुढी उभारतात. गुढी उभारण्यासाठी एका बांबूच्या काठीला रेशमी वस्त्र, कडूलिंबाची मोहर असलेली फांदी, आंब्याचे डहाळे, चाफ्याची व साखरेची माळ एकत्रितरित्या बांधून त्यावर तांब्याचा कलश बसविला जातो. अशी ही सजविलेली गुढी पाटावरील वस्त्रावर तांदूळ ठेऊन त्यावर उभी केली जाते. त्यानंतर पाटाभोवती रांगोळी काढून, गुढीला गंध, फुले, हळद-कुंकू, गंधाक्षता वाहतात व निरांजन लावून उदबत्ती दाखवितात. यावेळी ब्रह्मध्वजाय नमः असे म्हणून गुढीची रितसर पूजा केली जाते. दुपारी गोडाच्या नैवेद्याबरोबर पंचामृताचाही नैवेद्य दाखविला जातो. या दिवसभरातील गोडव्यानंतर सायंकाळी सूर्यास्ताच्यावेळी – ब्रह्मध्वज नमस्तेस्तु सर्वाभीष्ट फलप्रद । प्राप्तोस्मिन्सवंत्सरे नित्यं मद्‌गृहे मंगलं कुरू ।। ही प्रार्थना करून गुढीला गूळ-खोब-याचा नैवेद्य दाखवून ‘पुनरागमनायच’ असे म्हणून गंधाक्षता वाहून गुढी उतरवितात. अशा रितीने वसंतोत्सवातील हा गुढीपाडवा मंगलमय वातावरणात संपन्न होतो.

या दिवसापासून आपले आचरण मंगल व सात्त्विक करण्याचा निश्चय केला जातो. दिवसभरात आनंदाच्या क्षणी एकमेकांना गोड शुभेच्छाही दिल्या जातात. अशा या दिवसाला ऐतिहासिक महत्त्व देखील आहे. इतिहासात जे भव्य, दिव्य प्रेरक आणि स्फूर्तीदायक घडले आहे त्यांच्या पाऊलखुणा दर्शविणारा हा दिवस. अशा प्रकारे परस्परांतील स्नेह, एकोपा घडवून आणण्याचे सामर्थ्य या सणामध्ये आहे. अशी ही यशाची व आनंदाची गुढी प्रत्येकाच्या जीवनात उंच-उंच राहू दे. आणि जीवनातील खरा आनंद म्हणजे दुस-याशी एकरूप होण्यात असून परस्परांच्या भावनांशी समरस होणे यातच आहे. गुढी म्हणजे विजयध्वज ! हाच खरा जीवनातला आनंद..!!

दाही दिशा उजळती नववर्षाच्या तेजाने

प्रत्येक शुभकार्याची मुहूर्तमेढ रोवू या गुढीपाडव्याच्या निमित्ताने!

Share