‘श्रीरामनवमी’

(चैत्र शुध्द नवमी)

हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुध्द नवमीस श्रीभगवान विष्णूचा सातवा अवतार म्हणून ओळखले जाणारे प्रभू श्रीराम यांचा जन्म झाला. म्हणून आजचा दिवस रामनवमी म्हणून साजरा करतात. या दिवशी दुपारी ठिक १२.०० वाजता रामजन्म सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न होतो. चैत्र महिन्यातील पहिल्या पंधरवड्यातील नवव्या दिवशी साजरा होणारा हा सर्वात मोठा उत्सव असून या उत्सव काळात गायन, कीर्तनाचे कार्यक्रमही आयोजित केले जातात. या वेळी सर्व भाविकांना प्रसाद म्हणून सुंठवडा दिला जातो.

त्रेता युगातील दुष्ट शक्तींच्या निर्दालनासाठी भगवान श्रीविष्णूने भूतलावर अवतार घ्यावयाचे मान्य केले होते. हा अवतार म्हणजेच प्रभू श्रीरामचंद्र! जगाला रावणाच्या राजवटीतून मुक्त करून ज्यांनी असे रामराज्य निर्माण केले, ज्याकडे आपण स्वत:ला विसरून भारावून जातो अशी आदर्शवत व्यक्ती म्हणजेच प्रभू श्रीराम होय.

खरंतर आपली संस्कृती ही भोगावर नव्हे तर त्यागावर आधारलेली आहे, असे आपण म्हणतो त्याचे प्रत्यंतर देणारा राम. त्या प्रभू रामचंद्रांची आज जन्मतिथी हजारो वर्षांपासून आपण मोठ्या उत्साहात व पवित्र अशा मंगलमय वातावरणात साजरी करतो आहोत. भारतीय संस्कृतीचा आदर्श ‘राम’ पितृवचन पाळणारा व त्यासाठी स्वत:च्या राज्याचा सर्वस्वी त्याग करून अखंडितपणे १४ वर्षे वनवास स्वीकारणारा रामच होय. असा हा राम एकवचनी व एकपत्नी होता, म्हणूनच प्रभू रामचंद्रांना मर्यादापुरुषोत्तम असे म्हटले जाते.

श्रीरामनवमीचा उत्सव संपूर्ण भारतात आणि परदेशात सुध्दा मोठ्या उत्साहाने साजरा करण्याची परंपरा आजही सह्रदयतेने जोपासली जाते. अशा या मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्रांना कोटी कोटी प्रणाम…!

।। श्रीराम ।।

Share