।। शिवराज्याभिषेक सोहळा ।।

शके १५९६, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीस म्हणजेच ६ जून, १६७४ रोजी छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक पार पडला.

डोळ्यांचे पारणे फेडणारा हा अभूतपूर्व सोहळा तब्बल नऊ दिवस चालला होता. शिवरायांचा हा राज्याभिषेक सोहळा म्हणजे जणू भारताच्या इतिहासातलं ‘एक सुवर्णपानच’ होतं. ज्या काळात आणि ज्या परिस्थितीत शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापलं, त्या काळात आणि त्या आधी परकीय आक्रमणांनी देशाच्या स्वातंत्र्यसूर्याला ग्रासलं होतं आणि अशा परिस्थितीत स्वराज्य स्थापून स्वराज्याभिषेक करवून घेणं सोपं नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी एका महान साम्राज्याचा पाया रचला, ज्याने आधुनिक भारतीय इतिहासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

राज्याभिषेक विधी सशास्त्र होण्यास अनुकूलता आवश्यक होती; परंतु अनेक प्रतिकूल आपत्तींवर मात करून शास्त्रोक्त पद्धतीने स्वराज्याभिषेक काशीचे प्रकांड पंडित गागाभट्ट यांच्या पौरोहित्याखाली व साक्षात भवानी मातेच्या आशीर्वादाने संपन्न झाला. थोरामोठ्यांचे आशीर्वाद तसेच सहका-यांचे पाठबळ या जोरावर हा विधी रायगड येथे यथासांग पार पडला. ‘न भूतो न भविष्यती’ असा एक सोहळा रायगडाने पाहिला आणि तो सुवर्णक्षण अनुभवला देखील.

विधिप्रित्यर्थ लागणारे सर्व साहित्य विलंब न लावता जमविले गेले. त्यात महानद्यांची पुण्योदके, समुद्रोदके, सुलक्षणी अश्व व गज, व्याघ्रचर्मे, मृगचर्मे इत्यादी आणवली गेली. सिंहासन, सुवर्णादिकांचे कलश व इतर पात्रे तयार करवली गेली. विद्वान, ज्योतिषी यांनी सशास्त्र सुमुहूर्त पाहिले आणि त्यांच्या अनुमताने ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी हा दिवस राज्याभिषेकासाठी ठरविण्यात आला.

प्रतिष्ठित, विद्वान ब्राह्मण, मांडलिक, राजे, मातब्बर मंडळी, सेवक इत्यादी सर्वांना आमंत्रण पत्रे पाठवली गेली.

महाराजांनी रायगडावर राहावयासाठी उत्तम वाडा बांधला होता. इतर प्रधान, कारकून, अधिका-यांसाठी घरे बांधली होती. सिंहासनासाठी सभागृह बनवले होते. ते एवढे मोठे होते की, त्यात हजारो माणसे मावू शकणार होती. या सर्व व्यवस्थेवरून महाराजांची दूरदर्शी योजना व पूर्वलक्ष्यी हेतू लक्षात येतो. राज्याभिषेकास पंडितजनांची संमती मिळाल्यावर तेथील वाड्याच्या भिंती रंगवून त्यावर चित्रे काढून त्या परमरमणीय केल्या. ज्या मुख्य सदरेत सिंहासन मांडावयाचे होते, तेथे सोन्याने मढविलेले चार स्तंभ रोवून त्यास अमूल्य जरीचा चांदवा लावून त्यास सुशोभित करण्यात आले. गडावरील इतर जागा व इमारती रंगवून, साफसूफ करून घेतल्या गेल्या. येणा-या सर्व आप्तस्वकियांची राहण्या-खाण्याची व्यवस्था चोख केली गेली. ज्यांनी-त्यांनी आपणास नेमून दिलेली कामे ठरविल्याप्रमाणे, नियमानुसार उत्साहाने व निरलसपणे पार पाडली.

सर्व विधी शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात आले. मंगलवाद्यांच्या गजरात सर्व दिशा दणाणून गेल्या. ब्रह्मवृंदाने आशीर्वचने दिली. तोफांची सरबत्ती झाली. महाराजांनी रेशमी वस्त्र, अलंकार परिधान केले व मंत्रविधिपूर्वक पूजन करून शस्त्रे हातात घेतली. उपस्थित जनसमुदायाने जयजयकार करत त्यांच्यावर सोन्यारुप्याच्या पुष्पांची वृष्टी केली. आलेल्या सर्वांचा यथोचित बहुमान करण्यात आला. अशा त-हेने हा राज्याभिषेक सोहळा मोठ्या थाटाने व निर्विघ्नपणे पार पडला.

महाराजांनी ‘क्षत्रियकुलावतंस श्रीराजाशिवछत्रपती’ असा किताब धारण केला, तसेच राजमुद्रा देखील काढली. अगदी लहान वयात एवढा मोठा पराक्रम गाजवून अत्यंत स्तुत्य हेतू मनात ठेवून त्यांनी सिंहासनारोहण करवून घेतले होते. कागदोपत्री त्या दिवसापासून ते नवा शक लावू लागले व स्वराज्यातील सर्वांस हा शक चालू करण्याची ताकीद दिली.

प्रत्येक वर्षीप्रमाणे याही वर्षी ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साही व आनंदी वातावरणात रायगडावर साजरा होत आहे.

Share