।। ज्ञानोबांचा पालखी सोहळा ।।

पाऊले चालती पंढरीची वाट ! आषाढी वारी म्हटलं की, विठुरायाच्या भेटीची आस लागते. विठुरायाचे सावळे रूप डोळ्यांत सामावून घेण्यासाठी लाखो वारकरी ऊन-पावसाची पर्वा न करता रात्रंदिवस पंढरपूरच्या दिशेने पायी वाटचाल करत असतात. टाळ-मृदुंगाच्या गजरात पंढरपूरकडे जाणारे वारकरी आपला परंपरागत कुळाचार पार पाडण्यासाठी तयार असतो. हे विलोभनीय दृश्य बघण्यासाठी प्रत्येक भक्तगण आतुर झालेला असतो.

या वर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ११ जून रोजी आळंदी येथून प्रस्थान करेल व २८ जून रोजी पंढरपूरला पोहोचेल. वारकरी संप्रदायाला याच क्षणाची आस लागून राहिलेली असते. अलिकडे महाराष्ट्र शासन देखील अनेक सोईसुविधा उपलब्ध करून देते. अनेक दिंड्या या सोहळ्यात सामील होतात. गरीब, श्रीमंत, वृद्ध, तरूण, सानथोर, स्त्री-पुरुष असा कुठलाही भेदभाव या वारीमध्ये आपणास दिसत नाही. अनेक सोईसुविधा उपलब्ध असून देखील पालखीबरोबर पायी चालणा-यांची संख्यासुध्दा दिवसेंदिवस वाढतच आहे.

श्री विठ्ठलावर असलेली श्रध्दा या भक्तांना पंढरपूरला खेचून आणते. संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा हा एक फार मोठा अभूतपूर्व सोहळाच असतो. आषाढी एकादशीला विठुरायाची भेट होते.

वारीमधील वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे रिंगण होय. त्यातील शिस्तबद्धता वाखाणण्याजोगी असते. वारी मार्गावर काही ठराविक गावांमध्ये रिंगण आयोजित केले जाते. एखाद्या मोकळ्या माळरानावर किंवा मोठ्या मैदानावर साधारणपणे याचे आयोजन केले जाते. रिंगण ही एक पवित्र आणि श्रध्दयेय संकल्पना आहे.

वारी हा एक आनंद सोहळा असतो. वारीतून वारकरी संप्रदायाची सामाजिकता आणि समाजाभिमुखता स्पष्ट होते. पंढरपूरची वारी हा वारकरी संप्रदायाचा मुख्य आचारधर्म आहे. ३ जुलै रोजी ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा परतीच्या प्रवासासाठी अलंकापुरीकडे निघणार आहे.

Share