।। जोतिबाच्या नावानं चांगभलं ।।

लाखो भाविकांचे श्रध्दास्थान व कुलदैवत असलेले जोतिबा मंदिर हे कोल्हापूरपासून १५ किलोमीटर अंतरावर आहे. या जोतिबा देवतेला ज्योतिर्लिंग, केदारलिंग, रवळनाथ, सौदागर अशा विविध नावांनी संबोधले जाते. सुमारे १ हजार फूट उंचीवर शंखाकृती आकारात हत्तीच्या सोंडेसारख्या पसरलेल्या या जोतिबाच्या डोंगराला वाडी-रत्नागिरी असेही म्हटले जाते.

या मंदिरातील जोतिबाची मूर्ती काळ्या घोटीव पाषाणात घडविलेली असून या चतुर्भुज मूर्तीच्या हातात खड्‌ग, पानपात्र, डमरू व त्रिशूळ आहे. तिच्या शेजारीच जोतिबाचे उपवाहन शेष आहे. या देवतेचा शरीररक्षक काळभैरव बाहेरील बाजूस असून तेथे मूळ ज्योत कायमस्वरूपी तेवत असते. जोतिबाचे दर्शन घेण्याआधी काळभैरव व तिथे असलेल्या ज्योतीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. जोतिबाची भार्या यमाईदेवी हिची मूर्ती दगडाची असून या मूर्तीला शेंदूर लेपलेला असतो.

जोतिबाच्या जन्मादिवशी म्हणजेच रविवारी व श्रावण शुद्ध षष्ठीला येथे भाविकांची मोठी गर्दी होते. रत्नासुरावर मिळविलेल्या विजयाप्रीत्यर्थ चैत्री पौर्णिमेस याठिकाणी जोतिबाची भव्य यात्रा भरते. या काळात जोतिबा मंदिरात पहाटे ३ वाजता धार्मिक विधी सोहळ्यास प्रारंभ होतो. त्यानंतर ५ वाजता महाभिषेक व महापूजा करण्यात येते. सकाळी १०.०० वाजता धुपारती केली जाते. अशा या यात्रेच्या सोहळ्यास महाराष्ट्रासह कर्नाटक, मध्य प्रदेश व इतर भागातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात.

चैत्र पौर्णिमेच्या दिवशी जोतिबाच्या मूर्तीची प्रदक्षिणा मंदिराभोवती घातली जाते. या मिरवणुकीत ढोलताशांच्या गजरात अनेक भाविक देहभान विसरून मानाच्या सासनकाठ्या नाचवत असतात. डोंगरावरील सासनकाठ्यांची मिरवणूक हे या यात्रेचे प्रमुख आकर्षण असते. या सासनकाठ्या सुमारे ४० फूट उंचीच्या असून रंगीबेरंगी कपड्यांनी सजविलेल्या असतात. तर काही सासनकाठ्या नोटांच्या तसेच फुलांच्या माळांनीही सजविलेल्या असतात. अशा या उत्साही वातावरणात तरुणवर्ग गुलालात चिंब होऊन नाचत असतो. यावेळी संपूर्ण डोंगर परिसर ‘चांगभलं’च्या गजराने दुमदुमून जातो. त्यानंतर जोतिबाच्या चांदीच्या मूर्तीची पालखी मिरवणूक मंगलमय व पवित्र अशा वातावरणात तोफेच्या सलामीने जोतिबा मंदिरातून यमाई मंदिराकडे विविध वाद्यांच्या गजरात मार्गस्थ होते. यावेळी गुलाल-खोबरे, बंदी नाणी यांची पालखीवर होणारी उधळण अनोखी असते. त्यानंतर सायंकाळी यमाई मंदिरात यमाईदेवी व जमदग्नी यांच्या विवाह-सोहळ्याचा विधी संपन्न होऊन पुन्हा पालखी जोतिबा मंदिरात येते. शेवटी तोफेच्या सलामीने या पालखी मिरवणूक सोहळ्याची सांगता होते. अशा या यात्रेच्या वेळी मंदिर परिसर भाविकांनी फुलून जातो. असा हा चैत्रीय महिन्यातील जोतिर्लिंग यात्रेचा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होतो.

Share