सर्व मल्हार भक्तांना मार्तंडभैरव अर्थात खंडेरायाच्या प्रकट दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा !
कल्पारंभी ब्रह्मदेव तपात आणि नारायण योगनिद्रेत निमग्न असताना ब्रह्मदेवाच्या कर्णमलातून मधू आणि कैटभ जन्माला आले. त्यांचा वध नारायणानी केला. त्या वेळी त्यांच्या रक्ताचे थेंब शेषाच्या मस्तकावर पडले. त्यातून दोन जीव जन्माला आले. त्या जीवानी ब्रह्माची उपासना केली. त्यानी मागितलं की, ‘आम्हाला शिवाच्या हातून मरण यावं पण शिवाचं रूप एरव्ही पेक्षा भिन्न असावं.’ शक्तीसंपन्न होऊन ते जीव दैत्य झाले. आता त्यांना मणी आणि मल्ल या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांनी सह्याद्री पर्वतावर, मणीचूल पर्वतावर आपली राजधानी वसवली. त्यांनी उन्मत्त होऊन इंद्रादी देवांचे अधिकार काढून घेतले. एक दिवस त्यांनी मणीचूल पर्वताजवळ तप करणाऱ्या धर्मांगवीत, धर्मपालक, धार्मिक, धर्ममील, धर्मज्ञ, धर्मबाहू, धर्मकौतुक अशा सात धर्मपुत्रांच्या आश्रमावर हल्ला केला. त्यांनी मांडलेला यज्ञ विध्वंसला. त्रस्त ऋषी स्वर्गात इंद्राकडे गेले पण त्यांनी असमर्थता दाखवताच ते वैकुंठात नारायणाकडे गेले. नारायणानी वरदान लक्षात घेऊन ऋषींसह कैलासाला गमन केले. प्रारंभी ऋषींना वाईट वाटले की, साक्षात नारायण देखील आपल्याला साहाय्य करेनात; पण विष्णूंनी त्यांना धीर दिला आणि सांगितले की, ‘घाबरू नका तुम्हाला झालेला हा त्रास समस्त विश्र्वाचे कल्याण करणारी गोष्ट घडवणार आहे.’ नारायणांसह ऋषींना बघून भगवान शंकरांना प्रथम आनंद झाला पण त्यांच्या येण्याचं कारण ऐकून पंचमुख भगवान सदाशिव प्रचंड रागावले. रागाच्या भरात त्यांनी स्वत:ची जटा तोडून आपटली. त्या क्षणी एक उग्र अशी मारी शक्ती प्रगटली. या शक्तीला शांत करण्यासाठी ऋषींनी तूप म्हणजे घृत शिंपडले. म्हणून तिला घृतमारी असे नाव मिळाले. अनेक शस्त्रास्त्रे धारण करून प्रचंड निनाद करणारी ही विनाशककारी शक्ती आणि शंकराचा हा विक्राळ क्रोध बघून क्षणभर सर्व देव आणि ऋषी अवाक् झाले. हर हर शब्दाचा घोष झाला आणि क्षणात जणू सोन्याचा तेजःपुंज डोंगर डोळ्यासमोर उभा राहिला. आणि दुसऱ्याच क्षणी शंकरांच्या आसनाकडे पाहीलं तर हातात सुंदर खडग्, डमरू, त्रिशूल आणि पानपात्र ही चार शस्त्रं व्याघ्राजीना बरोबरच पितांबर, डोक्याला किरीट, गळ्यात कवडी हार, रूद्राक्ष माळा, कानात अही म्हणजे नागाची कुंडल सहस्त्रसूर्याची प्रभा फिकी पडावी अशा त्या मार्तंडभैरवाच्या किरीटावर चंद्रकोर शोभत होती. तो दिवस होता स्वारोचिष मन्वंतरातील ३१ व्या द्वापार युगात कलीयुगाला २४४ वर्षे पाच महीने १० दिवस बाकी असताना चैत्र पौर्णिमेला भर दुपारी हा अवतार झाला. रजनीचूर्ण म्हणजे भंडाराच्या उधळणीत चंद्राचा अवतार असलेल्या शुभ्र अश्वावर देव स्वार झाले. यळकोट म्हणजे सात कोटी मंत्राचा उद्गाता, सात कोटी गणाचा अधिपती युध्दाला निघाला. असा हा भक्तवत्सल जगत्पालक भोळा खंडेराया जसा सप्तर्षींसाठी धाऊन आला तसा आपल्या सर्वांच्या विघ्नाचे निवारण करो हीच प्रार्थना!
।। श्रीमातृचरणारविंदस्य दास प्रसन्न सशक्तीक: ।।
Comments (3)