संत रोहिदास
महान हिंदू संत रोहिदास यांचा जन्म चर्मकार घराण्यात आई घुरबिनिया यांचे पोटी वाराणसी जवळील सीर गोवरधनपूर गावात झाला. त्यांचे जन्मस्थान श्री गुरू रविदास या नावाने ओळखले जाते. त्यांच्या वडिलांचे नाव रघुराम असून ते चामड्याचे काम करीत होते. परंतु त्यांनी त्यांचे बहुतांश आयुष्य गंगा नदीच्या काठावर आध्यात्मिक अनुयायांमध्ये आणि सूफी संत, साधू व तपस्वी यांच्या सहवासात घालवले.
रोहिदास यांचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी झाला. त्यांच्या पत्नीचे नाव लोना होते. रोहिदासांच्या भक्तिवेडामुळे धंदा व संसाराचे नुकसान होऊ लागले म्हणून त्यांच्या वडिलांनी वडिलोपार्जित संपत्तीचा कुठलाही हिस्सा न देता रोहिदासाला वेगळे ठेवले. पुढे गुरू रामानंदांच्या संपर्कामुळे रोहिदासांचे ज्ञानभांडार वाढले व ते प्रत्येक विषयावर प्रवचन देऊ लागले आणि आपल्या प्रवचनातून वेद, उदनिषदे आणि दर्शनशास्त्राची महती विशद करू लागले.
भारतभर फिरून त्यांनी महान कार्य केल्यामुळे ते सुधारक संतांमध्ये अग्रणी होते. ते कुलभूषण कवी होते तसेच तत्कालीन प्रचलित सामाजिक विद्वान म्हणूनही त्यांची ख्याती होती. त्यांनी आपल्या कार्यातून लक्षणीय योगदान दिले. त्यांच्या गुरु ग्रंथ साहिब यामध्ये असलेल्या रचना आजही लोकप्रिय आहेत. गुरु ग्रंथ साहिब या शीख धर्मग्रंथांमध्ये रोहिदासांच्या भक्तिगीतांचा समावेश असून भक्ती चळवळीवर पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या प्रांतात गुरू म्हणून कायमचा प्रभाव पडला. त्यांचे व्यक्तिमत्त्व आध्यात्मिक स्वरूपाचे असून ते संत कवी व समाजसुधारक म्हणून ओळखले जात होते.
रोहिदास यांनी सामाजिक भेदभाव हटविण्यास आणि वैयक्तिक आध्यात्मिक स्वातंत्र्य मिळवण्याच्या प्रयत्नात एकतेला प्रोत्साहन दिले. तसेच त्यांनी परमात्म्यांच्या निर्गुण स्वरूपावर लक्ष केंद्रित केले. आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि हिमालयातील हिंदू तीर्थक्षेत्रांनाही त्यांनी भेट दिली. विद्वानांच्या मते, संत रोहिदास हे शीख धर्माचे संस्थापक गुरूनानक यांना भेटले. त्यांचा शीख धर्मग्रंथात आदर आहे आणि रोहिदासांच्या ४१ कवितांचा आदि ग्रंथात समावेशही आहे. रोहिदासांच्या जीवनाबद्दल आख्यायिका आणि कथांचा आणखी एक महत्त्वाचा स्त्रोत म्हणजे शीख परंपरेतील प्रेमलेखन म्हणजेच प्रेमबोध होय. अशा या महान हिंदू संत कवी रोहिदास यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!