इतिहासातील एक सोनेरी पान – ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’
भारताच्या आधुनिक इतिहासातील एक सोनेरी पान म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो ते महान कवी, तसेच स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी क्रांतिकारक म्हणजेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर होय. आपल्या मातृभूमीवर निर्व्याज प्रेम असणारे स्वातंत्र्यवीर सावरकर हे आजच्या काळात देखील भारतीयांना मार्गदर्शक ठरतात.
जाज्वल्य देशभक्ती, प्रगल्भ प्रतिभाशक्ती, प्रेरक नेतृत्त्व, तत्त्वनिष्ठ हिंदुत्त्ववादी राजकारणी, स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारी नेतृत्त्व असणारे, धर्माभिमान व विज्ञानवादी याशिवाय थोर समाजसुधारक असणा-या स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारताच्या इतिहासातील शतपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाते.
हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी लढणा-या या महान क्रांतिकारकाचा जन्म २८ मे, १८८३ रोजी नाशिक येथील भगूर या गावी झाला. पुढे १८९८ मध्ये झालेल्या रँडच्या खुनाबद्दल जुलमी इंग्रजांनी चाफेकर बंधूंना फासावर चढविले. या त्यांच्या अतुल्य बलिदानाने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मनात देशभक्तीविषयी क्रांतिज्योत पेटून उठली. त्यांनी आपल्या घरातील देवीसमोर ‘हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी भारतमातेला स्वातंत्र्याचा अभिषेक घालण्यासाठी मारिता-मारिता मरेन’ अशी प्रतिज्ञा देखील घेतली. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी सशक्त क्रांतिकारकांची ‘अभिनव भारत’ या नावे संघटना स्थापन करून तरूणांना क्रांतीची दीक्षा दिली.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे क्रांतिकारी विचार, आचार आणि कुशन नेतृत्त्वामुळे ब्रिटिश सरकार भडकले आणि त्यांनी सावरकरांना बॅरिस्टरची सनद देण्याचे नाकारले. हेच खरे क्रांतिकारकांचे मुख्य शिरोमणी असल्याचे ब्रिटिश सरकारच्या लक्षात आल्यावर त्यांनी सावरकरांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि भारताच्या अंदमान बेटावरील ही काळ्या पाण्याची शिक्षा त्यांना भोगावयाची होती. अंदमान बेटावरील असलेल्या सेल्युलर तुरुंगात सावरकरांनी अतिशय कष्टामध्ये दिवस काढले. तेथे त्यांनी ‘कमला’ नावाचे महाकाव्य रचले. हिंदुस्थानाविषयी अभिमान बाळगणा-या तेथील कैद्यांना सावरकरांनी साक्षर केले. पुढे भारतीय जनतेच्या दबावामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांची सशर्त सुटका करण्यात आली. त्यानंतर त्यांना रत्नागिरीतील तुरुंगात नजरकैदेत ठेवले गेले व त्यांना असे सुनावले की, ‘इथून पुढे आपण कोणतेही राजकीय कार्य करावयाचे नाही.’ या अटीवरच ब्रिटिश सरकारने त्यांना तुरुंगात ठेवले. तुरुंगातील होणा-या अनन्वय छळामुळे ते अतिशय थकलेले होते. परंतु अशा अवस्थेत देखील ते काही स्वस्थ बसले नाहीत. त्यांनी समाजातील अस्पृश्यता व अंधश्रध्दा याविरूद्ध बंड पुकारले. त्यांनी विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवून समाजातील चुकीच्या परंपरा, चालीरिती, अंधश्रध्दा, अस्पृश्यता निवारण्याचे कार्यही केले.
इ.स. १८५७ चे स्वातंत्र्यसमर, सहा सोनेरी पाने, काळे पाणी, माझी जन्मठेप, जात्यछेदक निबंध, संन्यस्त खड्ग हे नाटक शिवाय कमला नावाचे महाकाव्य, हिंदुपदपादशाही इत्यादी साहित्यांचे देशभक्तीने प्रेरित होऊन लिखाण केले. तसेच भाषाशुद्धी या त्यांनी लिहिलेल्या पुस्तकातून मराठी भाषेला समृद्ध करण्याचे महान कार्यही केले.
इ.स. १९३८ च्या अखिल भारतीय मराठी साहित्य संम्मेलनाचे ते अध्यक्ष देखील होते. यावेळी त्यांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी ‘लेखण्या मोडा आणि बंदुका उचला’ असे समाजाला आवाहनही केले होते. ‘ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला’ हे त्यांचे अजरामर गीत तसेच ‘जयोस्तुस्ते श्रीमहन्मंगले शिवास्पदे शुभदे’ हे स्वातंत्र्य देवतेचे स्तोत्र आजही हिंदुस्थानातील प्रत्येक भारतीयाला देशभक्तीची आणि देशप्रेमाची प्रेरणा देत आहे. अशा या देशाभिमानी स्वातंत्र्यवीराकडे मृत्यूला कवटाळण्याचे सामर्थ्यदेखील अंगी होते. अखेरीस वयाच्या ८३ व्या वर्षी म्हणजेच २६ फेब्रुवारी, १९६६ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी प्रायोपवेशन म्हणजेच अन्नत्याग करून अनंतामध्ये स्वतःला विलीन करून घेतले. असे हे भारतभूमीला लाभलेले वीरपुत्र स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!