श्री गजानन महाराज, शेगांव
श्री गजानन महाराज हे माघ वद्य सप्तमीस सन १८७८ रोजी भक्तांच्या कल्याणासाठी सर्वप्रथम शेगांव येथे प्रकटले. त्यांना पाहताक्षणी ते देवावतार आहेत याची शेगांववासियांना जाणीव झाली. त्यांच्या चेह-यावर सदैव ब्रह्मानंद व ब्रह्मतेज झळकत असे. ते अजानुबाहू असून नेहमी विदेही अवस्थेत असत. त्यांच्या प्रकटनानंतर त्यांची महती गावोगावी पसरत गेली. समाजातील गरीब, श्रीमंत, सुशिक्षित, अशिक्षित सर्व लोक त्यांचे भक्त होते. श्रध्दाळू लोकांना त्यांच्या गूढ वाणीचा अतिशय चांगला प्रत्यय येत असे. शेगांवी ३२ वर्षे महाराजांनी प्रकट अवतार कार्य करून आपल्या भक्तांना मार्गदर्शन केले. अशा या दिगंबर वृत्तीच्या या अवलिया गजानन महाराजांनी विविध चमत्कार करून तसेच भक्तांना साक्षात्कार घडवून आपल्या भक्तिमार्गाचे महत्त्व पटवून सांगितले. ते एक सिद्धयोगी पुरुष होते इतकेच नव्हे तर ते त्रिकालज्ञानीही होते.
महाराजांना भाकरीसोबत झुणका, मुळ्याच्या शेंगा, पिठीसाखर, हिरव्या मिरच्या अतिशय आवडत असत, म्हणून आजही गजानन महाराजांचा प्रसाद म्हणून झुणका-भाकरी दिले जाते. अद्वैत ब्रह्माचा सिध्दांत महाराजांच्या ‘गण गण गणात बोते’ या सिध्द मंत्रात व्यक्त झाला आहे. अशा या अवलिया सत्पुरुषाने भाद्रपद शुध्द पंचमी सन १९१० रोजी त्यांनी आपले अवतार कार्य संपविले. ज्या भक्तांना भगवंताविषयी प्रामाणिक निष्ठा, प्रेम व भक्ती आहे, त्यांना श्री गजानन महाराजांच्या साक्षात्काराचा प्रत्यय येतो. महाराजांचे भक्त कोट्यवधीच्या संख्येने आहेत व भक्तांनी गावोगावी महाराजांची मंदिरेही उभी केली आहेत. आजही श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन मोठ्या उत्साहाने सर्वत्र साजरा केला जातो.
गण गण गणात बोते । हे भजन प्रिय सद्गुरुते ।।
या श्रेष्ठ गजानन गुरुते । तुम्ही आठवीत राहायाते ।।
हे स्तोत्र नसे अमृत ते । मंत्राची योग्यता याते ।।
हे संजीवनी आहे नुसते । व्यावहारिक अर्थ न याते ।।