करवीरचा लोकोत्सव… श्री करवीरनिवासिनीचा रथोत्सव !
जोतिबा यात्रेचा दुसरा दिवस. परंपरेप्रमाणे करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी आई अंबाबाईचा रथोत्सव. दरवर्षी या दिवशी दुपारनंतर स्वयंस्फूर्तीने महाद्वार रस्ता, गुजरी, भाऊसिंगजी रस्ता, भवानी मंडप, महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूल, बालगोपाल तालीम, मिरजकर तिकटीचा शेषशायी, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग (नूतन मराठी शाळा ते बिनखांबी गणेश मंदिर) ते महाद्वार रस्ता हा सगळा मार्ग आपोआपच बंद केला जातो. आधीच पॉलिश केलेला आणि एरव्ही रामाच्या पाराजवळ असलेला संस्थानकालीन लाकडी पण आता चांदीनं मढवलेला रथ आणून महाद्वारावर उभा केला जातो. एकीकडे रथाची सजावट सुरू होते, तर दुसरीकडे रथोत्सवाचा मार्ग रांगोळ्यांनी सजायला लागतो. ते बघायला भाविकांची दाटी होते. आठच्या सुमाराला चोपदारांची ललकारी होऊन सनई-ताशांच्या निनादात श्रीपूजक अंबाबाईला रथावर घेऊन येतात. तिच्या पाठोपाठ हवालदार खांडेकर जाप्त्यावरचे पारंपरिक दागिने घेऊन हजर होतात. मग सुरू होतो त्रिभुवन सुंदरीचा शृंगार. दृष्ट लागण्यासारखं रूप पुजारी आपल्या हाताने साकारतात. एव्हाना नऊ वाजत आलेले असतात. भक्तांच्या घरच्या आरत्या यायला सुरुवात होते. पुजारी आरती ओवाळून प्रसाद देतात. आता रथाचे जू धरून भाविक विशेषतः युवावर्ग उभा असतो. इतक्यात साडेनऊला तोफेची सलामी होते आणि ‘नवकोटनारायणी….. श्रीमहालक्ष्मी’ अशी चोपदारांची ललकारी घुमते आणि रथ पुढे चालू लागतो. ‘गुलालाची उधळण आणि अंबामाता की जय’ चा घोष अखंड सुरू होतो. या रथाला जिथे भाविक विनंती करतात तिथे रथ थांबवून भाविकांची आरती स्वीकारली जाते. हळूहळू रथ पुढे सरकतो तशी आतषबाजी, रोषणाई आसमंत उजळून टाकत असते. वाद्यांचा निनाद, स्तोत्रांचे स्वर, धुपाचा दरवळ संपूर्ण वातावरण भारून टाकतो. गुजरी कॉर्नरच्या चौकातून रथ अलगद गुजरीत वळवला जातो. संपन्न अशा करवीर नगरीतून वैभवाची देवता आशीर्वादाची खैरात करत निघते. पुन्हा भाऊसिंगजी रस्त्याला रथ येतो. आता जगदंबेचं नवं रूप समोर येतं. एका सार्वभौम राज्य स्थापन करणाऱ्या छत्रपतींच्या राजधानीची शौर्यशाली, वैभवशाली नगरदेवता! रथ नगारखाना ओलांडून भवानी मंडपात येतो . महाराज छत्रपतींचा चोपदार महाराजांच्या नावाची ललकारी देतो त्यापाठोपाठ हुजूरस्वारींचं आगमन होतं. महाराज देवीचं पंचोपचार पूजन करतात आणि त्यानंतर आरती होते. पुन्हा ललकारी होऊन रथ मार्गस्थ होतो. आता म.ल.ग हायस्कूल, बालगोपाल तालीम, मिरजकर तिकटीमार्गे रथ नूतन मराठी शाळेसमोर येतो. पाठकांच्या घरासमोर रथ येताच चोपदार रोषण नाईक रथावरुन उतरतात आणि रंकोबाच्या देवळात जातात. इथं रंकभैरव कोल्हापूरचा कोतवाल जणू अंबाबाईच्या निरोपाचीच वाट बघत सदरेवर बसलेला असतो. महालक्ष्मीच्या चोपदारांनी ललकारी देताच रंकोबा आपल्या देवळात जातो. पुन्हा दर्शन करून हा लवाजमा बिनखांबी गणपतीकडे जातो. तिथंही अशीच पंचोपचार पूजा व ललकारी होऊन चोपदार रथावर येतात. आता रथ महाद्वारावर आणला जातो. मध्यरात्र होते पण उत्साह तोच असतो. वांगी बोळाचा कोपरा ओलांडताच रथाला वेग येतो आणि त्याच गतीत रथाचे जू महाद्वारासमोर ठेवले जातात. कदम घराण्यातील स्त्रीया पारंपरिक मानाप्रमाणे दृष्ट काढतात. एव्हाना श्रीपूजक पालखी घेऊन येतात. रथावरून उतरलेली महालक्ष्मी (अंबाबाई) पालखीत बसते. एवढ्या रात्री दीपमाळा उजळलेल्या असतात. परंपरेप्रमाणे अगस्तींच्या दीपमाळेला प्रदक्षिणा करून सात टप्प्यांवर गायन सेवा घेऊन अंबाबाई सदरेवर येते. भक्तांना आशीर्वाद देते. त्यानंतर तोफेची सलामी होताच पालखी मंदिरात जायला निघते आणि बालदत्ताजवळ क्षणभर थांबते. नैवेद्याच्या पूर्ण पानानं देवीची ओवाळणी होते आणि आई गाभाऱ्यात जाते. कर्पुरारती, शंखतीर्थ होऊन सोहळा संपतो तो मनामध्ये या रथोत्सवाच्या स्मृती ठेवूनच…!
।। मातृचरणारविंदस्य दास प्रसन्न सशक्तीकः ।।