श्री रेणुकादेवी प्रकट दिन !
आज चैत्र कृष्ण पंचमी. आदिशक्ती अयोनीजा बालिका रूप घेऊन ईक्ष्वाकू वंशी रेणू (प्रसेनजीत) राजाच्या यज्ञकुंडातून प्रकटली तो आजचा दिवस. काही परंपरांमध्ये चैत्र शुद्ध तृतीया हा दिवस रेणुकेचा प्रकट दिन मानला जातो; पण सौंदत्ती परंपरेत चैत्र तृतीया ही तिथी रेणुकेच्या मलप्रभा तीरावर स्नानाला जाणे आणि नंतर झालेल्या शिरच्छेदाची मानली जाते. परशुराम कवीकृत रेणुका माहात्म्य ग्रंथात (रामत्त्व प्रकाशन, बेळगाव) उल्लेख केलेप्रमाणे चैत्र कृष्ण पंचमी, मूळ नक्षत्र रवीवार धनुराशी असा तो योग. सर्वदेव तेजोमयी म्हणून ती एकवीरा रेणुराज कन्या म्हणून रेणुका औंधासूरमर्दिनी ती यमाई! कर्नाटकात यल्लम्मा. अशी ही जमदग्नी प्रिया…रेणुका! अशी तिची नानाविध रूपं. अनेक भाविकांना प्रश्न पडतो की, रेणुका तर ऋषीपत्नी तर तिला देवतेचा मान कसा? याचं उत्तर स्वतः भगवान शंकरांनी परशुरामांना दिलं होतं. त्याची कथा सह्याद्री खंडात येते. (रेणुका माहात्म्य अ.१८) परशुराम शंकरांना विचारतात, ‘असं काही सांगा जे कुणाला माहीत नाही.’ तेव्हा शंकर म्हणाले, ‘पूर्वी मी एकदा कल्पांत अग्नी पेटवून बसलो असता एका अलौकिक स्त्रीचं दर्शन झालं. तिला पाहून मी तो कल्पांत अग्नी प्राशन केला.’ तेव्हा त्या स्त्रीने आपला परिचय देऊन सांगितले की, ‘मीच या जगाचे आदिकारण शक्ती असून तू माझ्यासाठी या अग्नीचं प्राशन केलंस. याकरता तू भृगू कुळात जमदग्नी म्हणून अवतीर्ण होशील आणि मी रेणुका नावाने प्रकट होऊन तुझा पती रूपात स्वीकार करेन. तेच आम्ही तुझे माता-पिता!’
यानंतर पुढचा प्रश्न येतो की, मग रेणुकेला आदितीचा अवतार का म्हणतात? तर हा अवतार मुळात प्रकट झाला तोच नारायणाचा सहावा अवतार जन्मावा म्हणून! याकरता माता आदिती जी साक्षात जगदंबेचा अंश आहे जिच्यातून सर्व देवांना (इंद्र, सूर्य, अग्नी, वरुण) शरीर आणि सामर्थ्य प्राप्त झाले ती ही आदिती. (अदितीह्यर्जनिष्ठा दक्ष । या दुहिता तव तां अन्वजायंत । भद्रा अमृतबन्धवः।।) अर्थात दक्षकन्या आदितीपासून आम्ही अमर असे देव प्रकट झालो! (देवी अथर्वशीर्ष श्लोक १३)
तिने तप करताना सर्व देवांचे तेज पुन्हा एकत्र केले आणि नवे रूप धारण केले. त्यात पार्वतीचे संपूर्ण तेज असे ते एकवीरा स्वरूप! तीच एकवीरा बालिका रुप धारण करून रेणुराजाच्या अग्नीकुंडातून प्रकटली तीच ही माता रेणुका! औंधासूर वधासाठी केदारनाथ म्हणजे जोतिबाने ‘ये माई’ अशी हाक मारताच यमाई म्हणून धावून जी आली ती यमाई! कर्नाटकात जगदंबा अर्थात सर्वांची आई. याचं कानडीत ‘यल्लर अम्मा’ म्हणून ‘यल्लम्मा’ ! हिचे रेणुका तंत्रातले मूर्ती वर्णन असे –
वामे शूलकपालयुग्ममितरे खड्गं क्वणड्डिडीमं|
बिभ्राणांङ्कर पङकजैस्त्रिनयनां नागादिभूषोज्वलाम्||
नाना कोटी युगान्त सूर्यसदृशां कल्पांत कोपोज्वलां|
दक्षालंकृतहवाममुद्रितपदा श्रीरेणुकामाश्रये||
अर्थात, ती त्या रेणुकेचा आश्रय घेते जीने आपल्या कमळासारख्या डाव्या दोन हातात त्रिशूळ आणि पानपात्र, तर उजव्या हातात खड्ग आणि डमरू धारण केले आहेत. जीने नागांचे अलंकार धारण केले आहेत. आणि जी कोट्यवधी सूर्यासारखी तेजस्वी आणि जग जाळू शकेल अशा कोपाने संपन्न आहे!
।। श्रीमातृचरणारविंदस्य दास प्रसन्न सशक्तीक: ।।
Comments (150)