श्रीकृष्ण सरस्वती महाराज

श्रीकृष्ण सरस्वती महाराजांचा जन्म माघ महिन्यातील वद्य पंचमीला कोल्हापूर येथील नांदणी गावी झाला. दत्त संप्रदायातील ते एक थोर सत्पुरुष म्हणून नावारूपास आले. तसेच सांप्रदायिक श्रध्देनुसार स्वामींना दत्तात्रेयांचे चौथे अवतार मानले जाते. कोल्हापुरातील कुंभार आळीमध्ये त्यांचे वास्तव्य राहिले असल्याकारणाने ते मुख्यतः ‘कुंभारस्वामी’ या नावाने ओळखले जात.

श्रीकृष्ण सरस्वती हे १४-१५ वर्षांचे असताना यांना त्यांचे कुलदैवत श्री खंडोबारायांनी दर्शन देऊन अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ यांच्या दर्शनास जाण्यास सांगितले. त्याप्रमाणे पुढे ते वयाच्या १७-१८ व्या वर्षी स्वामींचे दर्शन घेण्यासाठी स्वतः एकटे अक्कलकोटला गेले. हे येण्यापूर्वी अक्कलकोटचे स्वामी ‘कृष्णा येणार, कृष्णा येणार’ असे म्हणत होते. अक्कलकोट गावच्या वेशीवर महाराजांनी यांना आलिंगन देऊन कवटाळले. त्यानंतर ते दोघेही अरण्यात जाऊन तेथे तीन दिवस एकांतात राहिले. त्यानंतर स्वामींनी कृष्णाला सांगितले की, ‘मी व तू एकच आहोत’. अरण्यातून परत आल्यानंतर स्वामींनी ‘कृष्णा जाणार, कृष्णा जाणार’ असे म्हणत त्यांच्या सेवकांना आज्ञा केली की, ‘चुरमा लड्डू खिलाव’ व कृष्णाला ते चुरमा लड्डू भरवले व स्वतःचे आत्मलिंग देऊन ‘श्रीकृष्ण सरस्वती’ हे नाव ठेवले.

काही दिवसानंतर स्वामींनी श्रीकृष्ण सरस्वतींना ‘आता यापुढे माझे सर्व कार्य तुलाच करावयाचे आहे.’ असे सांगून करवीर नगरीत जाण्याची आज्ञा केली. श्रीकृष्ण सरस्वती महाराज यांनी अनेक भक्तांना संसारमुक्त केले, तर काही संसारी भक्तांचे कल्याण केले. पुढे भक्तीमार्ग प्रसारासाठी १६ पट्टशिष्यांना अधिकार, वस्त्रे देऊन प्रसारासाठी पाठविले. अखेरीस कोल्हापूर येथील आपल्या एका पट्टशिष्याच्या अंगावर देह टाकून त्यांनी आपले पंचप्राण अनंतात विलीन केले. अशा या दत्त संप्रदायातील थोर सत्पुरुषाच्या आजच्या जयंतीदिनी कोटी कोटी प्रणाम!

Share