।। तुकोबांचा पालखी सोहळा ।।

ज्येष्ठ महिना आला की सगळ्यांना वारीचे वेध लागतात. पेरणीच्या कामातून शेतकरी मोकळा झालेला असतो. विठुरायाच्या भेटीची आस लागलेली असते. ही वेळ महाराष्ट्रातील ज्ञानेश्वर माऊली व तुकाराम महाराजांच्या पालखीची असते. महिनाभर चालणा-या या पालख्यांसह वारकरी विठ्ठलाच्या दर्शनास पंढरपूरला जाण्यास निघतात. लाखो वारकरी राज्याच्या कानाकोप-यातून विठ्ठलनामाच्या जयघोषात या पालखी सोहळ्यात सहभागी होत असतात. यंदा पालखी सोहळ्याचे ३३८ वे वर्ष आहे.
एक दिवसाच्या अंतराने तुकोबाराया आणि ज्ञानदेवांची पालखी निघते. तुकोबांची पालखी देहू येथून प्रस्थान करते. यंदा हे प्रस्थान १० जूनला होणार असून, ठिकठिकाणी मुक्काम करत हा पालखी सोहळा २८ जूनला पंढरपुरात दाखल होईल. महाराष्ट्रातून वेगवेगळ्या संतांच्या पालख्या सुद्धा या सोहळ्यात सहभागी होत असतात. भक्तिरसाने ओथंबलेली ही वारी दरवर्षी नित्यनेमाने चालतच असते. या वारीचे महत्त्व इतके मोठे आहे जणू पालखीबरोबर एखादे चालते-बोलते शहरच जाते आहे, असे वाटावे. सुरुवातीला काही हजार लोक चालत असतात व शेवटी पंढरपुरात जाताना ती संख्या लाखात होते. वारीत जाण्याची प्रथा ही वाडवडिलांपासून चालत आलेली असते. सर्व पिढीतील वंशज ही वारीची प्रथा आनंदाने पाळतात. पंढरीचा राणा ज्याचे दैवत आहे आणि जो ज्ञानोबा-तुकोबारायांचा भक्त आहे, असा कोणीही वारकरी होऊ शकतो. अशी ही सर्वसमावेशक वारी ३ जुलैला परतीच्या प्रवासास निघेल.
वारीच्या दरम्यान होणारे रिंगण हे वारीचे खास वैशिष्ट्य मानले जाते. कीर्तन-प्रवचन असे कार्यक्रम मुक्कामाच्या ठिकाणी होत असतात. पंढरपूरला जात असलेल्या वारकरी समुदायाची सेवा करण्याची संधी समाजाच्या विविध स्तरांतून घेतली जाते. काही मंडळी वैयक्तिक किंवा कौटुंबिक स्तरावर अशी सेवा पुरवतात. आषाढी एकादशीच्या पहाटे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सपत्नीक श्री विठ्ठल आणि रुक्मिणीची महापूजा करतात. याला शासकीय पूजेचा दर्जा दिला जातो. त्यांच्या बरोबर वारकरी समुदायातील एका दाम्पत्याला प्रतिवर्षी पूजेचा मान दिला जातो. असा मान मिळणे, वारकरी संप्रदायात आदराचे समजले जाते.