॥ तयाचा वेलू गेला गगनावरी…॥
सरस्वती’चा नंदादीप – श्री.सदाशिव शिर्के(भाऊ)

कोल्हापुरातील नामांकित चित्रकार व छायाचित्रकार श्री. दत्तात्रय नामदेव ऊर्फ डी. एन. शिर्के व सौ. सरस्वतीबाई यांच्या संसारवेलीवर १२ जानेवारी १९४८ रोजी आणखी एक फूल उमलले-त्यांना पुत्ररत्न झाले. त्याचे नाव ठेवले सदाशिव. श्री. डी. एन. शिर्के यांनी १९४४ साली कोल्हापुरात महाद्वार रोडवर भाड्याच्या जागेत रबरी शिक्के बनवण्याचा व्यवसाय सुरू केला होता. तसेच त्यांनी स्वतःच्याच नावे पहिली मराठी पंचांग दिनदर्शिका प्रकाशित केली. ‘मे. डी. एन. शिर्के अ‍ॅन्ड सन्स’ या दिनदर्शिकेतून सर्वसामान्य जनतेला उपयुक्त पंचांग माहिती सोप्या शब्दांत समजण्याची सोय झाली.

तरुणपणी कॉलेजचे शिक्षण घेत असतानाच सदाभाऊंनी वडिलांच्या हाताखाली पंचांगविषयीचे ज्ञान संपादित केले. इतिहास विषय घेऊन एम.ए. झालेनंतर त्यांची एस.टी. महामंडळामध्ये डेपो मॅनेजर या पदासाठी निवडसुध्दा झाली होती; पण महत्त्वाकांक्षी सदाभाऊंनी सरकारी नोकरी न पत्करता घरच्या व्यवसायामध्येच काम करण्याचा निर्णय घेतला.

त्यांनी कॉलेजचे शिक्षण पूर्ण करून दिनदर्शिकेच्या व्यवसायाची सूत्रे हातात घेतल्यानंतर काही दिवसांतच त्यांच्या वडिलांना हृदयविकाराचा मोठा झटका आला. ईश्वरकृपेने ते यातून सहीसलामत बाहेर आले. पण तब्येतीच्या कारणामुळे त्यांनी व्यवसायातून पूर्णपणे निवृत्ती घेतली आणि कौटुंबिक व व्यावसायिक जबाबदा-या आपल्या मुलांकडे सोपविल्या.

वडिलांनी सुरू केलेल्या दिनदर्शिकेचा खप हा कोल्हापूर, सांगली, बेळगाव वगैरे भागांमध्ये होत असे. आपली दिनदर्शिका संपूर्ण भारतातील मराठी भाषिकांपर्यंत पोहोचावी हे सदाभाऊंचे ध्येय होते. त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू केले. स्वतः महाराष्ट्रातील लहान-मोठ्या गावी जाऊन तेथील विविध यात्रा, उत्सवांची माहिती संकलित करण्यास सुरुवात केली आणि १९७७ साली त्यांनी प्रथम ‘श्री महालक्ष्मी दिनदर्शिका’ प्रकाशित केली.

त्या काळी कोल्हापुरातील प्रिंटिंग प्रेसमध्ये फक्त एकरंगी ट्रेडल मशीन असत. अशा मशीनवर एका रंगामध्ये छापलेली दिनदर्शिका ही आकर्षक दिसत नाही म्हणून सदाभाऊंनी तमिळनाडूतील शिवकाशी येथून बहुरंगी दिनदर्शिकेची छपाई करून घेण्याचे ठरविले. घरापासून हजारो मैल दूर शिवकाशी येथे ते स्वतः जात व तेथे महिनाभर वास्तव्य करून स्वतः ‘श्री महालक्ष्मी दिनदर्शिकेची’ छपाई करून घेऊन कोल्हापूरला आणत असत. त्यांना शिवकाशी येथे छपाई करून घेत असताना अनेक कटू अनुभव आले. एका वर्षी एका मुद्रकाने दिनदर्शिकेसाठी दिलेला कागद त्याच्या स्वतःच्या कामासाठी वापरून त्यांची फसवणूक केली. शेवटी या सर्व त्रासाला कंटाळून सदाभाऊंनी स्वतःचा प्रिंटिंग प्रेस सुरू करण्याचा संकल्प केला.

त्यांनी त्यांच्या राहते घरी प्रिंटिंग प्रेस सुरू केला. यासाठी त्यांनी बँकेमधून कर्ज घेऊन एक नवीन बहुरंगी शीटफेड ऑफसेट मशीन खरेदी केले. त्या मशीनमध्ये अनेक तांत्रिक दोष असल्यामुळे त्यात सतत बिघाड व्हायचा. त्या मशीनवर पहिल्यांदा दिनदर्शिका छपाईचे काम त्यावर सुरू केले असता निम्म्याहून जास्त कागद खराब झाला तरी दिनदर्शिका काही छापून होईनात! सुदैवाने त्यादरम्यान इचलकरंजी येथील एका प्रेसमध्ये ऑफसेट प्रिंटिंग सुविधा असलेचे समजले. तेव्हा जराही विलंब न करता आपल्या स्वतःच्या प्रेसमधील सर्व कागद तेथे नेऊन त्यावर्षीचे दिनदर्शिकेचे छपाईचे काम तेथून करून घेतले.

बँकेचे कर्ज घेऊन खरेदी केलेले ते नवीन मशीन खराब लागल्याने आर्थिक नुकसान झाल्यामुळे त्यांनी घरामध्ये सुरू केलेला प्रिंटिंग प्रेस बंद करण्याचा निर्णय घेतला. बँकेचे कर्ज भागविण्यासाठी १९७८ मध्ये सुमारे अडीच लाख रुपयांना खरेदी केलेले नवीन मशीन अक्षरशः कवडीमोलाने पन्नास हजार रुपयांना विकून टाकले. कर्ज भागविण्यासाठी त्यांनी स्वतःची नवीकोरी स्कूटर विकली व उर्वरित रक्कम आपले थोरले बंधू श्रीपाद यांच्याकडून त्यांच्या रबरी शिक्क्याच्या व्यवसायातून घेतली.

इचलकरंजी येथील प्रिंटिंग प्रेसमध्ये काही वर्षे छपाईचे काम सुरळीत पार पडले. ज्या वेळी दिनदर्शिकेचा खप वाढला त्या वेळी दिनदर्शिकेची छपाई शीटफेड ऑफसेट मशीनवर छापणे शक्य होईनासे झाले. आता वेळ आली होती ती दिनदर्शिकेची छपाई जादा क्षमता असलेल्या हायस्पीड वेब ऑफसेट मशीनवर करून घेण्याची. परंतु वेब मशीनची किंमत प्रचंड असल्यामुळे ते त्या वेळी घेणे शक्य नव्हते. म्हणून त्यांनी एका वर्तमानपत्र छापणा-या प्रेसला दिनदर्शिका छपाईची ऑर्डर दिली. फक्त ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाइट वर्तमानपत्र छपाईचा अनुभव असणा-या त्या मुद्रकाला बहुरंगी छपाई काही जमली नाही. त्या प्रयोगामध्ये त्या मुद्रकाने खूप कागद खराब केला. त्यामुळे त्यावर्षी आर्थिक नुकसान झाले.

जवळजवळ आठ-दहा वर्षे अनेक खाचखळगे पार केल्यावर, सगळ्या प्रतिकूल आणि नुकसानकारक अनुभवांचा सामना केल्यावर कुणीही माणूस हताश, निराश होईल, खचून जाईल… पण सदाभाऊ जराही विचलीत झाले नाहीत अथवा ध्येयापासून ढळले नाहीत. त्यांनी काडी काडी जमवून पुन्हा नवे घरटे बांधायचे ठरवले… नवी भरारी घ्यायचे ठरवले. व्यवसायाची पुनर्बांधणी आणि नव्या जागेत स्वतःचा नवीन अद्ययावत प्रेस सुरू करणे हे स्वप्न उराशी बाळगून सदाभाऊ वाटचाल करत राहिले.

मनातल्या या योजनेबद्दल त्यांनी सर्वप्रथम त्यांचे हितचिंतक व त्यांना गुरुस्थानी असलेले, ‘विद्यासागर पुस्तकालय’ चे मालक श्री. भाऊसाहेब शहा यांच्याशी विचारविनिमय केला. भाऊसाहेबांनी त्यांना ताबडतोब नवीन जागा घेऊन, प्रेस उभारण्याचा व मशीन खरेदी करण्याचा सल्ला दिला आणि त्यांनी सदाभाऊंना कर्ज मिळवून देण्यासाठी मदतही केली.

त्यानंतर सदाभाऊंनी कोल्हापूर लगतच्या कळंबा येथे प्लॉट खरेदी करून तिथे बांधकाम सुरू केले. पुढे बँकेचे कर्ज मंजूर झाल्यानंतर, त्यांनी १९८८ साली ‘मे.प्रिमिअर प्रिंटर्स’ ही प्रिंटिंग प्रेस उभारली. या प्रेसमध्ये त्यांनी ‘पॉलिग्राफ इंडस्ट्रीज’ या नामांकित कंपनीचे सेकंडहँड ‘वेब ऑफसेट प्रिंटिंग मशीन’ खरेदी केले. सदाभाऊंनी रुजवलेल्या या बीजाचा विस्तार जोमाने होत होता… त्यांच्या व्यवसायाचा व्याप वाढत होता. हळूहळू त्यांनी त्यांच्या प्रेस जवळचे रिकामे प्लॉटही खरेदी केले. त्यांच्या राहत्या घरी सुरू होऊन बंद पडलेला छपाईचा व्यवसाय नव्या जागेत लहानशा शेडमध्ये पुन्हा बहरला आणि एका शेडमध्ये सुरू झालेला हा प्रिंटिंग प्रेस ९० च्या दशकाच्या अखेरीस तीनमजली इमारतीत रूपांतरित झाला. या आधुनिक यंत्रसामग्रीने सुसज्ज अशा ‘प्रिंटिंग-कम्-बाइंडिंग’ युनिटद्वारे सदाभाऊंचे स्वप्न साकार झाले!

‘श्री महालक्ष्मी’ दिनदर्शिकेचा नावलौकिक व ग्राहकपाया विस्तारत चालला होता. विक्रीच्या आकड्यांची वाटचाल २५ लाखांच्या दिशेने सुरू होती. आता इतक्या प्रतींची छपाई ‘पॉलिग्राफ’ च्या ‘वेब मशीनवर करणेसुध्दा शक्य नव्हते. त्यामुळे त्यांना वृत्तपत्रांच्या छपाईसाठी वापरले जाणारे ‘मनुग्राफ’चे ‘न्यूजलाईन-२०’ हे नवीन मशीन खरेदी करणे भाग होते. मग त्यांनी बँकेकडून मोठे कर्ज घेऊन हे मशीन खरेदी केले. दिनदर्शिकेच्या हंगामात या मशीनवर दिनदर्शिकांच्या छपाईचे काम होत असे व एरवी महाराष्ट्र शासनाच्या शालेय पाठ्यपुस्तकांची छपाई व बाइंडिंगचे काम होत असे. ‘श्री महालक्ष्मी’ दिनदर्शिकेबरोबरच आता ‘प्रिमिअर प्रिंटर्स’ लाही नावलौकिक लाभला होता. हा पश्चिम महाराष्ट्रातील एक अग्रणी प्रिंटिंग प्रेस बनला होता.

दिनदर्शिकेच्या खपाने २५ लाखांचा टप्पा ओलांडल्यावर आणि प्रेसचे स्वरूप एखाद्या मोठ्या उद्योगासारखे झाल्यानंतर या व्यवसायासाठी त्यांना कळंबा येथील तीनमजली इमारतसुध्दा अपुरी पडू लागली. मग सदाभाऊंनी भविष्याची पावले ओळखून व व्यवसायाचा आणखी विस्तार करण्याच्या उद्दिष्टाने ‘सरस्वती पब्लिशिंग कंपनी’ चे रूपांतर ‘प्रायव्हेट लिमिटेड कंपनी’ त केले. आता त्यांनी ‘सरस्वती पब्लिशिंग कंपनी प्रा.लि.’ मध्ये स्वतःसह दोन भाऊ, त्यांच्या पत्नी व मुले या सर्वांना संचालकपदी नियुक्त केले, आणि कोल्हापुरात राजाराम रोडवर ‘वसंत प्लाझा’ मध्ये कंपनीचे कॉर्पोरेट ऑफिस सुरू केले. एव्हाना कळंबा येथील प्रेसचे विस्तारीकरण आवश्यक असले तरी तिथे वाढलेल्या वर्दळीमुळे ते शक्य होत नव्हते. म्हणून सन २००३ मध्ये त्यांनी कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत अडीच एकराचा प्लॉट घेतला.

‘श्री महालक्ष्मी’ दिनदर्शिकेचा ग्राहकवर्ग संपूर्ण महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश आदी राज्यांमध्ये पसरलेला आहे. या दिनदर्शिकेची निर्मिती कोल्हापुरात होते व वितरण अनेक राज्यांमध्ये होत असल्यामुळे त्यांनी मुंबई, पुणे, रत्नागिरी, गोवा या ठिकाणी स्वतःचे वितरण डेपो सुरू केले. त्यामुळे कर्मचा-यांची तिथे राहण्याची व त्या त्या विभागातील माल त्या त्या डेपोमध्ये ठेवण्याची सोय झाली.

सन १९४४ मध्ये ‘मे. डी. एन. शिर्के अ‍ॅन्ड सन्स’ च्या नावे प्रसिध्द होणा-या दिनदर्शिकेचे सदाभाऊंनी काळासोबत रूपडे पालटले. प्रथम मराठी भाषेत प्रकाशित झालेली ‘श्री महालक्ष्मी दिनदर्शिका’ सदाभाऊंनी हिंदी, इंग्रजी व गुजराती भाषेतही पोहोचवली आणि त्यांच्या अविरत मेहनतीचे व कल्पक धडाडीचे फळ म्हणून या दिनदर्शिकेने खपाचा ५० लाखांचा टप्पासुध्दा कधीच पार केला आहे!

सदाभाऊंची घोडदौड इथवरच थांबली नाही. त्यांनी सन २००४-२००५ मध्ये कागलच्या अडीच एकरांच्या प्लॉटमध्ये अत्याधुनिक औद्योगिक इमारत उभारून घेतली. पुढे वेळोवेळी गरजेनुसार वाढीव बांधकाम करून घेत हे युनिट ४०,००० चौ.फूट इतके विस्तारले आहे. आज या युनिटने महाराष्ट्रातील एक अग्रगण्य प्रिंटिंग-पॅकेजिंग युनिट म्हणून स्थान मिळवले आहे. दिनदर्शिकेच्या निर्मितीसाठी सुरू केलेले ‘प्रिमिअर प्रिंटर्स’ आज केवळ एक छापखाना न राहता, ती एक भव्य प्रिंटिंग-पॅकेजिंग इंडस्ट्री बनली आहे. आता ‘प्रिमिअर प्रिंटर्स’ अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांना त्यांच्या उत्पादनांसाठी आवश्यक असणा-या छापील ‘मोनोकार्टन्स’ सारख्या पॅकेजिंगच्या साहित्याचा पुरवठा करते.

सदाभाऊंनी त्यानंतर पुस्तक प्रकाशनाच्या क्षेत्रातही पाऊल ठेवले. त्यांनी अनेक गाजलेल्या, ‘बेस्ट सेलर’ इंग्रजी पुस्तकांच्या मराठी अनुवादाचे हक्क मिळवले. सध्या ‘सरस्वती पब्लिशिंग कंपनी प्रा. लि.’ तर्फे दर्जेदार अनुवादित पुस्तके प्रसिध्द होत आहेत.

उच्चविद्याविभुषित व मितभाषी सदाभाऊ धार्मिक व दानशूर म्हणून प्रसिध्द होते. त्यांना छायाचित्रण, वाचन व प्रवासाची विशेष आवड होती. त्यांनी व्यवसायाच्या निमित्ताने इंग्लंड, जपान, चीन, इटली, ऑस्ट्रिया, फ्रान्स, स्वित्झर्लंड अशा ब-याच देशांचे अनेकदा दौरे केले. त्यांची सदैव श्री महालक्ष्मी, श्री जोतिबा, श्री गणपती व श्री गजानन महाराजांवर श्रध्दा होती. त्यांनी अनेक गरजूंना सढळहस्ते भरपूर मदत केली, तसेच मंदिरांच्या जीर्णोध्दारासाठीही आर्थिक साहाय्य केले.

सदाभाऊंच्या या संपूर्ण खडतर पण यशस्वी वाटचालीमध्ये त्यांच्या पाठीशी त्यांच्या कुटुंबियांचे, खासकरून त्यांच्या आई सरस्वती, पत्नी जयश्री व त्यांचे थोरले बंधू श्रीपाद यांचे पाठबळ होते. सदाभाऊंनी पुढच्या पिढीला स्वतःच्या हाताखाली उत्तमरित्या तयार केले आणि योग्यवेळी व्यवसायाची सूत्रे त्यांच्या हाती सोपवली. त्यांनी पुतण्या-रणवीरला तो अठरा वर्षांचा असल्यापासून त्याला प्रिंटिंग प्रेसच्या कामात स्वतःच्या तालमीत तयार केले. त्याला दिनदर्शिकेच्या छपाईशी संबंधित सर्व बाबींत तरबेज बनवले. तसेच त्यांनी त्यांच्या मुलाला-रोहनला ‘मॅनेजमेंट’ चे शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला पाठवले, त्यामुळे त्यांना परदेशातून मशिनरी आयात करणे तसेच आंतरराष्ट्रीय प्रकाशकांशी व्यवहार करणे व विविध कॉर्पोरेट कंपन्यांशी ‘पॅकेजिंग’ व्यवसायाच्या संदर्भातील वाटाघाटी करण्यात त्याची मोलाची मदत झाली. त्यांचे दुसरे भाऊ जयवंत यांचा मुलगा अमित बी.ई.(सिव्हिल) असून, तो संपादकीय विभागाची धुरा सांभाळत आहे. त्याला रणवीर व रोहन सहसंपादक म्हणून साथ देत आहेत.

अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत श्री. सदाशिव शिर्के यांनी त्यांचे स्वप्न साकार केले. त्यांनी लावलेल्या छोट्याशा रोपाचा वेलू आज गगनावरी गेला आहे. आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी समृध्द वारसा निर्माण करणा-या या सर्वांच्या लाडक्या ‘भाऊं’नी ४ फेब्रुवारी, २०२१ रोजी आकस्मिकरित्या जगाचा निरोप घेतला, पण त्यांनी साकारलेले हे सोनेरी स्वप्न सदैव हसत राहील आणि त्यांची शिकवण त्यांच्या पुढच्या पिढ्यांना दीपस्तंभाप्रमाणे दिशा दाखवेल आणि देवघरात तेवणा-या नंदादीपाप्रमाणे त्यांना सदैव प्रकाश देईल!

– सुप्रिया वकील, कोल्हापूर

Share