दि.२ मे (वैशाख शु.२) रोजी होणाऱ्या शिवजयंतीविषयक…!
छत्रपती शिवाजी महाराज

खरी ‘शिवजयंती’ कोणती? असा वाद महाराष्ट्रातील इतिहासकार, काही अभिमानी कार्यकर्ते व शिवप्रेमी यांच्यामध्ये सुरू झाला. तो वाद अजूनही पूर्ण संपुष्टात आलेला नाही, अशी अप्रत्यक्ष कबुली सध्याचे अधिक प्रसिद्ध असे शिवचरित्रकार ग.भा.मेहेंदळे यांनी आपल्या मराठी शिवचरित्रात दिली आहे.

शिवछत्रपतींसारख्या युगपुरुषाचा वाद सरकारी पातळीवर मिटविण्यात काही संशोधक-अभ्यासकांना २२ वर्षांपूर्वी म्हणजे इ.स.२००० साली यश आले. परंतु प्रत्यक्षात १९४९ पासून शिवजन्मतिथी वैशाख शुद्ध २ शके १५४९ (८/१० एप्रिल, १६२७) ही जुनी शिवजन्मतिथी आणि जेधे शकावलीमध्ये नव्याने प्राप्त झालेली फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (१९ फेब्रुवारी, १६३०) ही जन्मतिथी यांपैकी खरी शिवजयंती कोणती असा वाद महाराष्ट्रातील इतिहासकार, काही अभिमानी कार्यकर्ते व शिवप्रेमी यांच्यामध्ये सुरू झाला. तो वाद अजूनही पूर्ण संपुष्टात आलेला नाही, अशी अप्रत्यक्ष कबुली सध्याचे अधिक प्रसिद्ध असे शिवचरित्रकार ग.भा.मेहेंदळे यांनी आपल्या शिवचरित्रात दिली आहे.

वादातील प्रमुख टप्पे

  • १९१६ मध्ये लोकमान्य टिळकांच्या नावे जेधे शकावली प्रसिद्ध झाली. त्यामध्ये प्रथमच फाल्गुन वद्य ३ शके १५५१ (१९ फेब्रुवारी, १६३०) ही शिवजन्म तारीख पुढे आली. त्यामधून वादाला प्रारंभ झाला.
  • १९१८ च्या सुमारास स.म.दिवेकर यांना तंजावर येथील सरस्वती महल पॅलेस लायब्ररीमध्ये ‘सूर्यवंश’ ही कवी परमानंद या शिवछत्रपतींच्या समकालीन कवीची संस्कृत भाषेतील काव्यग्रंथाची प्रत मिळाली.
  • भारत इतिहास संशोधक मंडळात स.म.दिवेकर यांनी आपला ‘सूर्यवंश’ (शिवभारत) यासंबंधी निबंध वाचला. (२७ जून ते २८ जून, १९२२)
  • १९२३ साली फोर्ब्स या इंग्रजी अभ्यासकाने संकलित केलेला साधनांचा संग्रह प्रसिद्ध झाला. त्यापैकी फक्त एका बाडात फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ ही तारीख मिळाली.
  • त्याचाच आधार घेऊन नवीन जन्मतारखेचे समर्थन करणारा ज.स.करंदीकर यांचा लेख ‘केसरी’ मध्ये (२० मे १९२४) प्रसिद्ध झाला. त्याच तारखेप्रमाणे शिवजयंती करण्याचे त्यांनी आवाहन केले.
  • ३ फेब्रुवारी, १९२५ च्या ‘केसरी’ मध्ये का.ना.साने, द.वि.आपटे, द.वा.पोतदार यांच्यासह १२ जणांनी नवीन तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी करण्याचे पत्रक प्रसिद्ध केले.

याउलट प्रसिद्ध इतिहासकार गो.स.सरदेसाई, वि.स.वाकसकर आणि दा.ना.आपटे यांनी या नवीन तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी करू नये अशी विनंती करणारे पत्रक काढून त्यामध्ये वैशाख शुद्ध तृतीया शके १५४९ हीच शिवजन्म तारीख खरी असून त्याप्रमाणेच शिवजयंती करावी असे जाहीर केले.

यामधून नवीन शिवजन्मतिथीचे म्हणजे फाल्गुन वद्य ३ शके १५५१ चे समर्थन करणारा आपटे-दिवेकर संपादित ‘शिवचरित्र प्रदीप’ हा ग्रंथ (१९२५), तर रियासतकार सरदेसाई यांनी संक्षेपाने संपादित केलेला ‘Shivaji Souvenir’ हा इंग्रजी ग्रंथ प्रकाशित झाला. याच ग्रंथात वैशाखवादी शिवजन्मतिथीच खरी असल्याचे साधार स्पष्टीकरण करणारा प्रो.चिं.ग.भानू यांचा लेख समाविष्ट करण्यात आला.

१९३०-३५ च्या दरम्यान फाल्गुनवादी अभ्यासकांनी आपल्याकडील पुरावे कमी पडतात म्हणून की काय शेवटी ज्योतिषशास्त्राचा आधार घेतला. त्यासाठी राजस्थानात सापडलेल्या (?) शिवछत्रपतींच्या काही कुंडल्या पुढे आणल्या.

वैशाखवादी शिवजयंतीचे खंदे समर्थक प्रबोधनकार के.सी.ठाकरे यांची प्रस्तावना असणारी वि.स.वाकसकर आणि प्रो.चिं.ग.भानू यांचे लेख असणारी पुस्तिका १९५४ मध्ये प्रसिद्ध झाली.

महाराष्ट्र सरकारने शिवजन्मतिथीचा वाद मिटविण्यासाठी ३ नोव्हेंबर १९६६ रोजी इतिहासतज्ज्ञांची एक समिती नेमली. त्यामध्ये द. वा. पोतदार, प्रा. न. र. फाटक, डॉ. आप्पासाहेब पवार, ग. ह. खरे, वा. सी. बेंद्रे, ब. मो. पुरंदरे, डॉ. मो. ग. दीक्षित यांचा समावेश होता. या समितीला आपला निर्णय देण्यासाठी केवळ दोन महिन्यांची मुदत प्रथम देण्यात आली. नंतर ती मुदत दोन महिन्यांनी वाढविण्यात आली. या समितीच्या केवळ दोन बैठका झाल्या, परंतु या समिती सभासदांमध्ये एकमत झाले नाही. प्रा.न.र.फाटक आणि डॉ.आप्पासाहेब पवार यांनी वैशाख शुद्ध २/३ शके १६४९ हीच शिवजन्मतिथी खरी असल्याचे ठामपणे सांगितले. त्यामुळे शासनाने ९ मे १९६७ रोजी जुन्या शिवजन्मतिथीत कोणताही बदल सध्या करण्याचे नाकारून तीच शिवजन्मतिथी चालू ठेवली.

त्यानंतर २८ वर्षांनंतर म्हणजे १९९५ मध्ये फाल्गुनवादी अभ्यासकांनी शासनाकडे नव्या शिवजन्मतिथीचा आग्रह धरला. त्यासाठी मार्चेबांधणी करण्यात आली.

वैशाखवादी पुरावे

इतिहासाचार्य राजवाडे यांच्यापासून ते अगदी ग.भा.मेहेंदळे यांच्यापर्यंत सर्वच इतिहासकारांनी सभासद बखरीपासून ते मराठी साम्राज्याच्या छोट्या बखरींपर्यंत शिवचरित्राच्या अभ्यासासाठी वापर करून घेतलेला आढळतो.

वैशाखवादी शिवजन्मतिथीचे अभ्यासक आणि संस्कृततज्ज्ञ प्रा.रा.आ.कदम यांचे मते एकूण १७ बखरीमध्ये शिवजन्म हा वैशाख महिन्यातील आणि शके १५४९ असाच दिला आहे.

वि.का.राजवाडे यांच्यासारख्या प्रतिभासंपन्न इतिहासकाराने श्री शिवछत्रपतींचे सप्त प्रकरणात्मक चरित्र (चिटणीसाची बखर) शिवदिग्विजय, रायरी बखर आणि ९१ कलमी बखर आणि काही जंत्र्या यांचा वापर करून शके १५४९, प्रभव संवत्सर वैशाख शुद्ध पंचमी सोमवार रोहिणी नक्षत्रावर शिवाजीचा जन्म झाला हे विश्वसनीय दिसते असे म्हटले आहे. तर लोकमान्य टिळकांनी शिवजन्मतिथी वैशाख शुद्ध प्रतिपदा पंचमी शके, १९४९ म्हणजे ६/८ एप्रिल, १६२७ अशा सिद्ध केल्या आहेत.

रियासतकार सरदेसाई यांनी आपल्या शिवचरित्राच्या प्रस्तावनेत (१ ऑगस्ट, १९३५) रोजी लिहिले आहे. ‘सर यदुनाथ (सरकार) व दुसरे अभ्यासक मिळून आम्ही स्वतंत्र व एकत्र या प्रश्नांचा पुष्कळ खल व विचार केला. त्यात जुनी तिथीच जास्त विश्वसनीय मानण्याकडे आमची प्रवृत्ती होत आहे हे आरंभीच सांगणे मला जरूर वाटते.’

याखेरीज शिवछत्रपतींच्या वयासंदर्भात काही पुरावे बखरी, सनदी परकीय व्यक्तींच्या नोंदी इत्यादी आधारे प्राप्त होतात. ते पुरावे वैशाखवादींच्या बाजूचेच आहेत. उदा. शिवराज्याभिषेकाच्या वेळी हजर असणारा इंग्रजी वकील सर हेन्‍री ऑक्झिंडेन शिवछत्रपती त्या वेळी ४७ वर्षांचे असल्याचे सांगतो.

फाल्गुनवादी फोल पुरावे

नवीन शिवजन्मतिथी म्हणजे फाल्गुन वद्य तृतीया, शके १५५१ (१९ फेब्रुवारी, १६६०) यासाठी केवळ तीनच महत्त्वाची साधने म्हणजे कवी परमानंदाचे ‘शिवभारत’, जेधे शकावली आणि तंजावर येथील बृहदीश्वर मंदिरात १८०३ मध्ये सापडलेला शिलालेख यांचा आधार दिला जातो; परंतु ही तिन्ही साधने कशी विश्वसनीय नाहीत यांचे अनेक पुरावे अभ्यासकांनी दिले आहेत. ते थोडक्यात पुढीलप्रमाणे –

जेधे शकावली प्रसिद्ध होऊनही लोकमान्य टिळक आणि वि.का.राजवाडे यांनी आपल्या शिवजन्मतिथीच्या (वैशाखवादी) निर्णयात बदल केला नव्हता. दा.ना.आपटे यांनी जेधे शकावलीमध्ये अनेक दोष आणि विसंगती दाखवून दिल्या आहेत. (इंद्रधनुष्य – दा.ना.आपटे, २८/२/१९२९, पृ.३३०-३३१)

कवी परमानंद यांच्या शिवभारतातील सहाव्या अध्यायातील, ‘भूबाण प्राण चंद्राव्दैः सम्मिते शालीवाहने । शके संवत्सरे शुक्ल प्रवृत्तेच पारायणे ।।२६।। निशिलग्ने शुभोभने ।।२७।।’ या श्लोकात ‘प्राण’ या शब्दाऐवजी मूळ प्रतीत ‘रस’ हा शब्द होता. ‘रस’ या शब्दाचे अंकमूल्य नव्या शिवजन्मतिथीला मारक होते. म्हणून त्याजागी ‘प्राण’ हेतूपूर्वक घालण्यात आला. भारत इतिहास संशोधक मंडळाच्या त्रैमासिक १९२२-२३ च्या अंक २।३।४ मध्ये तो मूळ श्लोक वाचावयास मिळतो. प्रसिद्ध इतिहासकार यदुनाथ सरकार यांना हे शिवभारत काव्य साधन म्हणून मान्य नव्हते.

प्रा.न.र.फाटक यांच्या मते, तंजावरचा शिलालेख हा शिवछत्रपतींचे सावत्र बंधू व्यंकोजीराजे यांना शिवछत्रपतींपेक्षा वयाने मोठे दाखविण्याच्या हेतूने कोरण्यात आला आहे. म्हणून त्यामध्ये शिवजन्म शके १५४९ ऐवजी शके १५५१ असा आहे.

थोडक्यात म्हणून महाराष्ट्र शासनाने १५ फेब्रुवारी, २००० मध्ये शिवछत्रपतींची जी १९ फेब्रुवारी, १६३० म्हणजेच (फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१) ही जन्मतारीख मान्य केली आहे ती बदलण्याची नितांत गरज आहे, असे अनेक अभ्यासकांना मनःपूर्वक वाटते.

Share