अक्षय्यतृतीयेचे महत्त्व

वैशाख शुद्ध तृतीयेस साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त म्हणून अक्षय्यतृतीयेला महत्त्व आहे. अक्षय्य म्हणजे कधीही क्षय न होणारा, नाश न पावणारा असा होय. या दिवशी सोने, वाहन, कपडे अशा वस्तूंची लोक खरेदी करत असतात. कारण अक्षय्यतृतीया हा साडेतीन मुहूर्तातील एक शुभ दिवस आहे. शास्त्रामध्ये बुधवारी व रोहिणी नक्षत्र ज्या अक्षय्यतृतीयेस येईल तो दिवस सर्वात उत्तम समजला जातो. या दिवशी दान देणेची प्रथा असून दानधर्म केल्यास आपले पुण्य वाढते असेही मानले जाते. म्हणून भुकेल्या व्यक्तीस अन्न तसेच गोरगरिबांना वस्त्रे दान केली जातात.

ज्येष्ठ व आषाढ महिन्यात तयार होणारे धान्य या दिवशी दान करावयाचे असते. असा हा अक्षय्यतृतीयेचा मुहूर्त मंगल-शुभंकर दिवस मानला जातो. या दिवशी केलेले दान अक्षय्य टिकणारे असते. लोक या दिवशी पाणपोई काढून तहानलेल्या पांथराला जलदान करतात. तसेच या दिवशी जनावरांना खाद्य देखील देतात.

अक्षय्यतृतीयेचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो. या दिवशी पितरांचे स्मरणार्थ त्यांच्या फोटोचे पूजन करून हार घालणे, नैवेद्य दाखविणे तसेच एक पाण्याचा कलश भरून तो कलश पाण्यासह दान करणे व त्यासोबत वस्त्र देणेची प्रथा आहे.

कृषी संस्कृतीचा पालक हा बलराम असून त्यादिवशी त्याची मनोभावे पूजा करतात. बलराम म्हणजेच हलधर. हल म्हणजे नांगर. पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नांगरलेल्या जमिनींची मशागत करण्याचे काम या दिवशी पूर्ण केले जाते. कारण जमिनीतून भरभरून धान्य पिकावे अशी शेतकरीवर्गाची भावना असते. चैत्र महिन्यातील अक्षय्यतृतीयेला स्त्रिया चैत्र गौरीची स्थापना करून हळदी-कुंकू समारंभ करतात.

अक्षय्यतृतीया हा दिवस केवळ हिंदूच नाही तर जैन, बौद्ध, शिख, ख्रिश्चन व पारशी लोकसुध्दा पाळतात. त्यांच्या परंपरांमध्ये या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी जैन समाजात जे व्रत केले जाते त्याला ‘आखा तीज’ असेही म्हटले जाते. पुराणामध्ये सांगितलेल्या वनस्पती अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर जमिनीत लावल्या तर त्या वनस्पतींचा तुटवडा भासत नाही. या वनस्पती अक्षय्य मिळतात. या दिवशी सातूचे महत्व असून त्याचेही सेवन केले जाते. अशा विविध वैशिष्ट्यांनी नटलेला हा दिवस आपल्या जीवनात अक्षय्य असा आनंद व समाधान देतो.

Share