चैत्र महिन्यात देवांना दवणा का वाहतात याची कथा.

चैत्र महिन्याच्या पहिल्या पक्षात सर्व देवांना दवणा वाहिला जातो त्या संदर्भात एक कथा सांगितली जाते.  दवणा म्हणजे दमनक 

शिवाच्या क्रोधातून कालभैरव प्रगटला, प्रगट होताच त्यानं ब्रम्हदेवांच पाचवं मस्तक तोडले ते त्याच्याच डाव्या हाताला ब्रम्हहत्या होऊन चिकटलं त्यातून गळणारं रक्त प्यायला कुत्री पिशाचं गोळा झाली तर  त्यांचा आणि या उग्र बटूच्या भय निर्माण करणाऱ्या रव म्हणजे आवाजामुळे याला भैरव असं नाव मिळालं. साक्षात पितामहांना शासन झाल्यान सगळी सृष्टी घाबरून गेली. भैरवाला आवर घालण्यासाठी विष्णूंनी त्याला शाप दिला सर्वांच दमन करणारा तू वनस्पती होशील तत्क्षणी  तो उग्र भैरव उग्र वासाची वनस्पती झाला तोच दमनक अर्थात दवणा !

दवण्याच्या झाडास वास फार उग्र येतो. दुरून वास आला असता मात्र बरा वाटतो. यास तुरे येतात, त्यासही झाडाप्रमाणे वास येतो. दवण्याचा सुगंधी पदार्थात पुष्कळ उपयोग होतो. दवण्याची झाडे घराच्या आसपास लावल्याने घरात सर्प येत नाहीत. दवणा तिखट, शीतळ, कडू, तुरट, व सुगंधी असून कुष्ठ, कंडू, संग्रहणी व ग्रहपीडा यांचा नाश करतो. सर्पाच्या विषावर दवण्याच्या मुळ्या व पाने देतात अगर त्याचा रस काढून देण्यात येतो. गुरांसहि हे औषध दिल्यानें गुण येतो. गर्मीवर दवणा, व मरवा यांचा सर काढून प्याला असतां गुण येतो.

चंदन व दवणा यांच्यात शीतलता देण्याची क्षमता सारखीच असली, तरी चंदन फक्त ओले असतांनाच शीतलता देऊ शकते, तर दवणा दिवसभर शीतलता देऊ शकतो( ही  औषधी माहिती Dailyhunt वरून साभार) 

असा हा भैरव दवणा झाल्यावर विष्णूंनाच दया आली त्यांनी त्याला मूळ रूपात आणून दवण्याला वर दिला आज पासून तू आम्हाला सर्व देवांना प्रिय होशील चैत्र महिन्यात आम्ही तिथीवार तुला धारण करु( उदा तृतीया गौरी चतुर्थी गणपती पंचमी लक्ष्मी षष्ठी कार्तिक …. पौर्णिमा सर्व देव) चतुर्दशी ही तुझी हक्काची तिथी तेव्हा तू स्वत: आणि एकवीरा हा दवणा धारण करा. याला अनुसरून आजही आपण चैत्र महिन्यात देवाला दवणा अर्पण करतो

श्रीमातृचरणारविंदस्य दास:प्रसन्न सशक्तीक:

Share