शिवरायांचे आठवावे रूप । शिवरायांचा आठवावा प्रताप । भूमंडळी ।।

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहेत. सुमारे ३०० वर्षांहून अधिक काळ लोटला तरी असा एकही दिवस जात नाही की, शिवाजी महाराजांचे नाव घेतले जात नाही. अखिल भारतवर्षात शिवाजी महाराजांच्यासारखे दुसरे व्यक्तिमत्त्व सापडत नाही. महाराजांना स्वातंत्र्याचे व स्वाभिमानाचे बाळकडू लहानपणापासूनच त्यांच्या मातोश्रींनी पाजलेले होते. त्यामुळे परस्थांच्या मगरमिठीत सापडलेला प्रदेश सोडवून त्यांनी जनतेला स्वातंत्र्यानुभव घडवून दिला.

वैभवाच्या शिखरावर पोचलेला आदिलशहा व सार्वभौमसत्ता पावलेला मुघल बादशहा यांचेकडे मोठे द्रव्यबल व प्रचंड सैन्यबल असतानासुध्दा महाराज त्यांना पुरून उरले. महाराजांचे ठायी निस्सीम पितृभक्ती होती. मुधोळच्या घोरपड्यांनी शहाजीराजांना फसवून पकडून दिले याचा सूड त्यांनी घोरपड्यांवर उगवला. पितृप्रेमास अनुसरूनच त्यांनी त्या वेळी उग्र स्वरूप धारण केले. स्वराज्य स्थापन करून ते सिद्दीस नेणे हा त्यांचा संकल्प होता. स्वराज्य रक्षणासाठी किल्ले बांधणे, त्यांचा उत्तम बंदोबस्त ठेवणे यासाठी द्रव्यबल लागत होते. ते मिळविण्यासाठीच त्यांना मोगलांच्या प्रांतात वारंवार मोहिमा काढाव्या लागल्या. त्यामुळे प्रजेला सुखी ठेवण्यासाठी ते सदैव झटले.

महाराजांनी प्राप्त ऐश्वर्याचा उपभोग घेण्याचे कधीही मनात आणले नाही किंवा सुखविषयाची पूर्ण अनुकूलता असतानाही त्यात ते एक क्षणही गुंतून राहिले नाहीत. ‘हिंदुस्थान देश यवन सत्तेतून मुक्त केल्यावाचून विश्रांतीच घ्यावयाची नाही’ असा या महापुरुषाचा दृढसंकल्प होता. अत्यंत परिश्रमाने सतत ३० वर्षे ते युद्ध व लढाया करीत होते. त्यामुळे त्यांच्या देहास किंवा मनास आराम असा कधीच प्राप्त झाला नाही.

राजे असूनसुद्धा त्यांचा पेहेराव नेहमी साधा असे. अलंकार धारण करणेचा त्यांना शौक नव्हता. आपल्या पदरच्या लोकांनी चांगल्या कामगिरी केल्या तर त्यांना बक्षिसे देण्याचे औदार्य त्यांच्या ठायी होते. ‘स्वराज्य व स्वातंत्र्य संपादन करण्यासाठीच आपण जन्म पावलो आहो व ते साध्य करण्यातच आपल्या जीविताचे सार्थक आहे’ असे त्यांना सदैव वाटत असे. त्यामुळेच जगाच्या इतिहासात ज्यास तोड नाही अशी साहसाची कृत्ये त्यांच्या हातून घडली.

महाराज हे स्वतः धार्मिक वृत्तीचे होते. महाराजांनी स्वराज्य निर्मितीचे कार्य हाती घेऊन यवन सत्तेपुढे आव्हान उभे केल्याबरोबर मोरपंत पिंगळे, बाळाजी सोनदेव, दत्ताजी पंत असे ब्राह्मण मुत्सद्दी शिवाय बाळाजी आवजी, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी असे स्वामीभक्त, प्रभूवीर तानाजी मालुसरे, प्रतापराव गुजर व हंबीरराव मोहिते, दौलतखान, इब्राहिमखान, मदारी म्हेतर तसेच बाळाजी आवजी चिटणीस यांच्यासारखे प्रतापशाली वीर महाराजांच्या राष्ट्रप्रेमाच्या कार्यात सहभागी झाले.

महाराजांचे ठायी कल्पकता, तेजस्विता व स्वाभिमान याशिवाय स्वप्रजावात्सल्य हे अप्रतिम गुण होते. राज्यकारभार सुव्यवस्थित चालावा यासाठी त्यांनी अष्टप्रधान मंडळाची कल्पना अंमलात आणली. तसेच त्यांनी आपल्या कल्पकतेच्या जोरावर स्वराज्यावर आलेल्या अरिष्टांचे निवारण केले. महाराजांच्या या गुणांमुळेच आज त्यांचे चरित्र जगभरात अजरामर झालेले आहे.

‘आपण कोणी सामान्य मनुष्य नाही. या आर्यभूचे पांग फेडण्यासाठी आपले जीवित आहे, असे त्यांस वाटे व त्याप्रमाणेच महाराजांनी आपले जीवन सत्कारणी लावले.’

असे हे धर्माभिमानी, न्यायप्रिय, अन्य धर्मियांचा आदर ठेवणारे, कठोर शासक, श्रीमानयोगी, सैन्याच्या अग्रस्थानी राहून शत्रूला भिडणारे तसेच परस्त्रीला मातेसमान मानणारे असे हे इतिहासातील एकमेव व्यक्तिमत्त्व म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज होय! आजही त्यांची शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. अशा या थोर महापुरुषास मानाचा मुजरा…!

Share