डी.एन.शिर्के तथा आबाजी

जीवनकार्य व परिचय

मे. शिर्के कॅलेंडर, श्री महालक्ष्मी दिनदर्शिका आणि मे.डी.एन.शिर्के ॲण्ड सन्स, रबरी शिक्क्यांचे उत्पादक या उद्योगांचे संस्थापक व प्रवर्तक श्री. दत्तात्रय नामदेव शिर्के म्हणजेच डी.एन.शिर्के तथा आम्हा सर्वांचे आबाजी होत. इ.स.१९१० मध्ये दत्तजयंतीच्या शुभदिनी जन्मलेले हे आबाजी चिकाटीचे, कष्टाचे, जिद्दीचे यशस्वी जीवन जगत त्यांनी सर्व व्याप आपल्या मुलांच्या हाती सोपवून तो ते कार्यक्षमतेने सांभाळत आहेत हे पाहून या नश्वर जगाचा निरोप घेतला.

मनुष्य मर्त्य असतो, कार्य अमर असते. आबाजींचे तसेच होते. त्यांचे कार्य, त्यांची कार्यपद्धती काहींना ज्ञात असली तरी असंख्यांना अज्ञात आहे. ती इतरांना कळावी व त्यापासून त्यांनी प्रेरणा घ्यावी म्हणून ही शब्दश्रध्दांजली.

आबाजींचे आजोळ शिवाजी पेठ, कोल्हापूर येथे होते. वडील आबाजींच्या लहानपणीच वारल्यामुळे ते पितृसुखास पारखे झाले. पण ती उणीव त्यांच्या आस्तिक्य बुद्धीने म्हणजे दत्तावतार बालमुकुंद बालावधूत महाराजांच्या भक्तीने भरून काढली.

पित्याच्या विरहाने आबाजींना एक गोष्ट कळून चुकली की, कष्टाशिवाय पर्याय नाही. त्यांना खोटेपणाची अतिशय चिड होती. प्रामाणिकपणा, नीतिमत्ता, सचोटी व जिद्द या गोष्टी त्यांनी अखेरपर्यंत सांभाळल्या. परिस्थितीमुळे ते मुलकीच्या पलीकडे शिकू शकले नाहीत. पण शिक्षणाची उणीव त्यांनी कधी भासू दिली नाही. पोटासाठी ते सुतारकाम शिकले. त्यामध्ये ते इतके तरबेज झाले की, स्वतःच्या दुकानातील फर्निचर देखील त्यांनी स्वतः केले.

आबाजींना लहानपणापासूनच चित्रकलेची आवड होती. १९३२ साली किर्लोस्कर, स्त्री वगैरे मासिकांमध्ये त्यांनी चित्रे काढली होती. तसेच त्यांनी त्या काळी अनेक मासिकांमध्ये गोष्टीही लिहिल्या होत्या. या आवडीखातर तर त्यांनी अक्षरशः हजारो रुपये खर्च केले. त्या कलेत ते पारंगत झाले. सुतारकाम सोडून बकरे-माने कंपनीमध्ये आबाजी नोकरीस लागले. तेथे त्यांनी इमानेइतबारे काम करून धंद्याचे शिक्षण घेतले. आबाजींना कंपनीचे मालक मल्हारराव बकरे हे जणू त्यांना मुलाप्रमाणेच मानत असत. जीवनाची वाटचाल यशस्वी कशी करावी हे बकरे अण्णांनीच आबाजींना शिकविले. पुढे बकरे-माने कंपनी बंद झाली. परंतु आबाजी काही गप्प बसले नाहीत. त्यांनी महाद्वार रोडवर फ्रेम मेकिंगचे दुकान काढले. यावेळी त्यांना रेंदाळकरअण्णा, रामभाऊ जोशी, बाबुराव जाधव इत्यादी प्रतिष्ठितांचे सहकार्य लाभले. हे काम करीत असताना आबाजींचा फोटोग्राफीचा छंद उसळी मारून वर यायचा. वयाच्या १२ व्या वर्षी महाराष्ट्र फिल्म कंपनीमध्ये छायाचित्रकार म्हणून कॅमेरा हाती धरलेला होता. त्यांनी अनेक प्रकारचे कॅमेरे हाताळले होते. त्यांच्या काही फोटोंना नियतकालिकांमध्ये प्रसिद्धी मिळाली व बक्षिसेही मिळाली.

कधीकाळी त्यांचा मूकपटाशी संबंध आला होता. ते रुपेरी पडद्यावर झळकले आणि जीवनाला आणखी एक वळण मिळाले. फोटोफ्रेम्सचा धंदा करून त्यांनी रबरी शिक्के तयार करण्याचा नवीन व्यवसाय सुरू केला. ती कला त्यांनी अथक परिश्रमाने आत्मसात करून संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी नाव कमावले. आबाजींचे जिद्दी मन एवढ्यावर समाधान पावत नव्हते. तर त्यांनी लग्नपत्रिकांची वगैरे छपाई करून त्यातही यश संपादन केले होते. त्यांची मुले आता मोठी होऊ लागली होती. रबरी शिक्के बनविण्याचा उद्योग त्यांच्या स्वाधीन करून पुढे दिनदर्शिकेच्या कामात आबाजी चमकले त्यात त्यांनी आपले पंचप्राण ओतले आणि तन-मन-धन वाहून दिनदर्शिका उद्योगाकडे ते वळले.

सन १९४१ मध्ये त्यांनी प्रथम स्वतःचे नावाचे शिर्के कॅलेंडर प्रकाशित केले. त्याची किंमत १ आणा होती व ते कॅलेंडर त्यांनी स्वतः गावोगावी फिरून विकले होते. त्यामध्ये सणवार, तिथी, नक्षत्र, उत्सव इत्यादी सामान्य माणसाच्या गरजेच्या गोष्टी घालून कॅलेंडरला पूर्णत्व आणले. शिर्के कॅलेंडर म्हटले म्हणजे सामान्यांची उडी पडे. कालांतराने कॅलेंडरचा खप वाढत लाखोंच्या घरात गेला. जास्तीतजास्त माहिती देणे हे शिर्के कॅलेंडरचे वैशिष्ट्य होय. अशा रितीने आबाजींनी केवळ कष्टावर व प्रामाणिकपणावर जनसामान्यांची सेवा संपादन केली.

 १९४२ च्या चळवळीत त्यांचा मोठा सहभाग होता. बुलेटिन छापणे, वाटणे, लावणे अशी असंख्य कामे त्यांनी केली. कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या स्वरूपात मदत करूनही ते स्वतः नामानिराळे राहत असत. त्यांच्या त्या आठवणी ऐकताना मन भारून जात असे.

सन १९७४ मध्ये आबाजींच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या मुलांनी ‘श्री महालक्ष्मी दिनदर्शिका’ प्रकाशनास प्रारंभ केला. मुलांची कर्तबगारी पाहून कॅलेंडरचा संपूर्ण व्यवसाय त्यांनी मुलांच्या स्वाधीन केला. सन १९८८ मध्ये आबाजींच्या मार्गदर्शनाखाली ऑफसेट प्रेसची उभारणी झाली. आबाजींनी स्थापन केलेली ‘सरस्वती पब्लिशिंग कंपनी’ प्रकाशन व्यवसायात अग्रेसर म्हणून ओळखली जाते.

आबाजींचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू होते. ते यंत्रतज्ञ होते. तसेच कलाकारही होते. त्यांनी काढलेल्या चित्रांपैकी श्री दत्तात्रेय, श्री नृसिंह सरस्वती, श्रीकृष्ण सरस्वती, छत्रपती शिवाजी महाराज इत्यादी चित्रे वाखाणण्यासारखी आहेत. यात बाबुराव पेंटर, बाबा गजबर, एस.एन.कुलकर्णी यांचे मार्गदर्शन आबाजींना मिळत होते. तसेच कॅलेंडर प्रकाशनामध्ये कै.हिरमठस्वामी, कै. ना. ग. देशिंगकरशास्त्री यांचे त्यांना बहुमोल मार्गदर्शन झाले.

कालाय तस्मै नमः । आबाजींनी वृध्दापकाळ ओळखला. ते शांत, एकांतप्रिय झाले. समाधानी जीवन जगू लागले. मुले योग्य मार्गाने वाटचाल करीत आहेत, हे त्यांचे सर्वात मोठे समाधान होते. साफल्य आस्तिक्यबुद्धीने, श्रमाच्या, जिद्दीच्या, प्रामाणिकपणाच्या जोरावर मनुष्य किती मोठा होऊ शकतो, याचे कै. डी. एन. तथा आबाजी शिर्के हे नव्या पिढीला एक मार्गदर्शक, प्रेरणादायी उदाहरणच आहे.

म्हणूनच या श्रध्दांजलीची अल्पशी खटपट.

– स्व. भाऊसाहेब शहा, कोल्हापूर

Share