महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर

स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ, समाजसुधारक, पत्रकार, वकील तसेच दलित बौध्द चळवळीचे प्रेरणास्थान असलेले शिवाय भारतीय बौध्द धर्माचे पुनरुज्जीवक महामानव म्हणून ओळखले जाणारे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती!

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल, १८९१ साली मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यातील महू या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर असून त्यांना बाबासाहेब या नावाने ओळखले जात असे. त्यांच्या लहानपणीच आईचे निधन झाल्याने ते मातृप्रेमाला मुकले. त्यानंतर बाबासाहेबांचा सांभाळ त्यांच्या वडिलांनीच केला. त्यांच्यावर त्यांनी चांगले संस्कार करून शिक्षणाचे धडे देखील दिले.

मुळातच प्रचंड बुद्धिमत्ता असणारे, दलित समाजाला हक्क मिळवून देणारे तसेच या समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घालणारे दीनदलितांचे कैवारी, स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग, दलित शिक्षण संस्थेची स्थापना, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना, महाडचा सत्याग्रह अशा अनेक कित्येक गोष्टी बाबासाहेबांनी आपल्या जीवनात केल्या. समाजातील तळागाळातील व्यक्तींचा प्रामुख्याने विचार करून त्यांच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडविला. समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर त्यांनी संघर्ष केला. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा गुरूमंत्र देखील त्यांनी समाजाला दिला.

बाबासाहेबांवर तथागत गौतम बुद्धांच्या शिकवणुकीचा आणि महात्मा जोतिबा फुलेंच्या कार्याचा प्रभाव होता. ते स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते होते. स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री असलेल्या बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानात सिंहाचा वाटा होता. देशातील बहुसंख्य अस्पृश्यांसाठी त्यांचा हक्क मिळवून दिला. दलितांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी ते दिवसरात्र झटले. हिंदू धर्मात आपल्याला समतेची वागणूक देण्यात यावी यासाठी त्यांनी मोठा लढा दिला. शेवटी हिंदू धर्माचा त्याग करून त्यांनी बौध्द धर्माचा स्वीकार केला. या घटनेमुळे भारतात बौध्द धर्म पुनर्जीवित झाला. डॉ. बाबासाहेबांनी केलेल्या धर्मांतराची जागतिक इतिहासात नोंद झाली तर या धर्मांतराला ऐतिहासिक स्वरूप प्राप्त झाल्याने ते जगातील सर्वात मोठे सामूहिक धर्मांतर ठरते. अशा या धर्मांतराचा कार्यक्रम उरकून आणि आता धम्मचक्र पुन्हा एकदा गतिमान झालेले पाहून ते आपल्या पुढील वाटचालीस लागले. त्यांनी आपल्या परतीच्या प्रवासात बनारसमध्ये दोन भाषणे केली. त्यानंतर दिल्लीमध्येही त्यांनी विविध समारंभात सहभाग घेतला. नेपाळमधील काठमांडू येथील ‘वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट’च्या चौथ्या परिषदेस ते हजर राहिले. शिवाय राज्यसभेच्या अधिवेशनातही सहभाग घेतला होता. तसेच आपल्या ‘भगवान बुद्ध’ आणि ‘कार्ल मार्क्स‌’ या पुस्तकाचे शेवटचे प्रकरण लिहून पूर्ण केले. अखेरीस दि.६ डिसेंबर, १९५६ रोजी दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी या महामानवाचे महापरिनिर्वाण झाले! या थोर महामानवास आजच्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

Share