ज्योतिर्लिंग यात्रा, जोतिबा डोंगर कोल्हापूर

देव जोतिबा कोट्यवधी भक्तांच्या भक्तीविश्वाचा अधिपती. या देवाची चैत्र यात्रा म्हणजे या तमाम भक्तांच्या आनंदोल्हासाचा क्षण ! पाडव्याला उभी केलेली सासनकाठी कामदा एकादशीला डोंगरावर आणायची. देवाला प्रदक्षिणा घालून नेमलेल्या जागी उभी करायची. हस्त नक्षत्रावर नाथ केदार यमाई भेटीला निघतो, तेव्हा ही सासनकाठी मिरवत यमाईकडे जायचं. नाथाचा गुलाल होऊन तृप्त व्हायचं. हा यात्रेचा विधी पण यामागचा इतिहास बघितला तर लक्षात येईल. हा आनंद सोहळा आहे देवी यमाई अर्थात रेणुका आणि महर्षी जमदग्नी यांच्या पुनर्मिलनाचा.

कृत युगात पिता जमदग्नींच्या आज्ञेप्रमाणे परशुरामाने माता रेणुकेचे मस्तक उडवले; पण वरदानात पुन्हा माता बंधूला जीवदान आणि जमदग्नी ऋषींच्या क्रोधाचा त्याग मागितला. महर्षींनी क्रोधाचा त्याग करून रेणुका आणि पुत्रांना सजीव केले. जमदग्नींच्या क्रोधाचा हा रवांश धारण करून हा रवळनाथ केदार अवतार झाला.

देव केदार दक्षिणेला आले. नानाविध देवतांच्या हातून नानाविध असूरांचा वध करविला. औंध गावात औंधासूराचा वध करताना मूळमाया रेणुकेला येमाई अशी हाक मारली तीच माता यमाई. पुढे रक्तभोज रत्नासुराचा वध करून देव निघाले तेव्हा महालक्ष्मीने त्यांना थांबवून त्यांचा सेनापती म्हणून पट्टाभिषेक केला. नेमके या वेळी यमाईला आमंत्रण द्यायचे राहिले. तिचा रूसवा काढायला देव निघाले. बारा मुलखाचे भक्त देवाची शासन ध्वजा म्हणजे सासनकाठी घेऊन डोंगरावर जमले. एकादशीला निघालेले देव हस्त नक्षत्रावर औंधला यमाईच्या दारी पोचले. देवांना पाहताच यमाईने दार बंद केले. इतरांना वाटलं देवी रूसली पण नाथांनी अर्थ ओळखला. माता पित्याची पुन्हा भेट घडवण्याची वेळ आली हे जाणून त्यांनी स्वतःच्या तलवारीतून जमदग्नीना प्रकट केले. माता आणि ऋषींची भेट झाली. तीन वर्षांनी माता यमाईच स्वतः रत्नागिरीवर आली. आजही दरवर्षी नाथ यमाईच्या भेटीला जातात. देव समोर सदरेवर बसतात. देवांची कट्यार आत यमाईच्या गाभा-यात जाते. तिथं रितसर यमाई-रेणुका आणि कट्याररूपी जमदग्नींचा विवाह होतो. हा सोहळा करवून नाथ आपल्या भक्तांसह कृतकृत्य होतो.

।। श्रीमातृचरणारविंदस्य दासः प्रसन्न सशक्तिकः ।।

Share