सासनकाठी -: नाथ केदाराचा विजय ध्वज

 20 फूटाहून अधिक उंचीची वेळूची बांबूची काठी त्याला पटके, निशाण, फरारा त्यावर आपल्या कुलपरंपरेला दर्शवणारं चिन्ह व नाव, वरच्या टोकाला कलश, चवरी, गोंडा, मोर्चेल, चोपाची मूठ यापैकी आपल्यात जी रीत असेल ती. जमिनीपासून 5 – 5.5 फूटावर आडवी फळी त्यावर देवाची मूर्ती किंवा घोडा.

अशी सासनकाठी पाडव्याला मढवून उभी केली त्या काठी सह मानकरी मंडळींना वेध लागतात ते जोतिबाच्या दर्शनाचे. एकादशी पासून काठ्या डोंगरावर पोहोचू लागतात. हलगी, डफड, सुंद्री, पिपाणी, कैताळ घुमायला लागते. काठी बरोबर ती घेणा-याच्या अंगा-मनावर गुलाल उडतो. चांगभलं चा आवाज गरजतो आणि एक निराळाच कैफ वातावरणात भरतो. नाचत-गर्जत काठी पायरी उतरते. चुकलेलं वासरू गायीला भेटावं तशी काठी शिखराला भेटते. संसारतापानं पोळलेली सासुरवाशीण आईच्या गळ्यात पडावी तशी त्या एका भेटीत भक्ताचे सगळे आर्त केदारीला कळतात आणि याच जाणिवेत भक्त आपले क्लेष विसरतो. पाच प्रदक्षिणा करून काठी आणि भक्त ठरावीक जागेवर पोहचतात. हस्त नक्षत्रावर या काठ्या क्रमाने यमाईकडे जातात आणि वर्दी देतात, ‘आईसाहेब, तुमचा नाथकेदार येतोय !’. आणि यमाई ? तिचा राग एव्हाना शांत झालाय पण मौन सोडेना. राज्याभिषेकाला बोलवणं आल नाही म्हणून माता रागावलीय हे कळताच तो नाथजोगी सगळा लवाजमा घेऊन निघालाय. म्हणून त्याचे बारा गावचे भक्त हा शासनध्वज घेऊन आलेत.

चांगभलं !

Share