आजपासून सुरू होणा-या श्री ज्योतिर्लिंग यात्रेचे महात्म्य

(सध्या दर्शनासाठी येणा-या भाविकांना ई पास ची जरुरत नाही.)

विश्वनिर्मितीनंतर आपलं श्रेष्ठत्व संपूर्ण सृष्टीला समजावं म्हणून ब्रम्हा विष्णू महेशांनी एक महायज्ञ केला. त्यांचा वृथाभिमान जिरवण्यासाठी जगदंबेनं म्हातारीचं रूप घेऊन ब्रम्हादि देवांसमोर त्यांच्याहून शतपटीने समर्थ असे त्रिदेव त्यांना घडवून दाखवले. हे पाहून त्रिदेवांचा गर्व गेला. जगदंबेन या नव्या त्रिदेवांना आज्ञा केली, जेव्हा मी साद घालेन तेव्हा तुम्ही एकाकार होऊन प्रकट व्हा. पुढे विश्वोद्धारक पुत्र व्हावा या कामनेने पौगंड ऋषी आणि त्यांची धर्मपत्नी विमलांबुजा  ईश्वराची उपासना करत होते. 

ईकडे करवीर क्षेत्री  कोल्हासूर, रत्नासूर इ. असुरांनी उत्पात माजवला होता. त्यांचा संहार करण्यासाठी  करवीर सोडून हिमालयात गेलेली  महालक्ष्मी पुन्हा करवीरी यायला निघाली. येताना केदार क्षेत्री तीने आपल्या वरदानानुसार शतमुख त्रिदेवांना साद घातली. हे त्रिदेव जमदग्नींचा रवांश (क्रोधांश) आणि बारा सूर्याचे तेज एकवटले आणि चैत्र महिना शुक्लपक्ष षष्ठी युक्त सप्तमी तिथी रवीवार  सूर्योदयाला  विमलांबुजेच्या ओंजळीत ज्योती रूपात प्रकटले. मातेचं ह्रदगत जाणून ही ज्योत आठ वर्षाच्या बटू रूपात हातात खड्ग (तलवार), डमरू, त्रिशूल आणि अमृतपात्र धारण करून प्रगट झाली.  तोच रत्नासूर मर्दन दक्षिणाधीश ज्योतिर्लिंग श्री नाथ केदार !

आज या निमित्ताने वाडी रत्नागिरी अर्थात ज्योतिबा डोंगरावर सायंकाळपासून उद्या सूर्योदयाच्या वेळेपर्यंत देवाचे पूजा उपचार सुरू राहतात. ठराविक कालावधीनंतर देवांची नवीन पूजा केली जाईल. सकाळी सूर्योदयाच्या वेळी नाथांचा प्रकट क्षण साजरा करून आरती होईल. चांगभलं च्या गजरात या यात्रेदरम्यान लाखो भाविक जोतिबाचे दर्शन घेतात.

श्री मातृचरणारविंदस्य दासः प्रसन्नसशक्तिकः

Share