महाशिवरात्रीचे महत्त्व

माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून सर्वत्र पाळली जाते. प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते. मात्र माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिमा मोठा असतो. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात व भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुस-या दिवशी व्रताची सांगता करतात. उत्तर भारतात हाच दिवस फाल्गुन महिन्यात गणला जातो, तर इंग्रजी महिन्याप्रमाणे हा दिवस फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येतो.

संस्कृत पुराणातील साहित्यापैकी अग्नी पुराण, शिव पुराण, पद्य पुराण या ग्रंथांमध्ये महाशिवरात्री व्रताचे महत्त्व सांगितलेले आहे. या दिवशी बेलाची पाने वाहून शिवाची पूजा करावी असे या व्रताचे स्वरूप आहे. महाशिवरात्रीला भगवान शंकराने तांडव नृत्य केले अशीही आख्यायिका प्रचलित आहे.

महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा होते. पंचगव्य म्हणजे गायीचे दूध, तूप, शेण, गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक केला जातो. त्यानंतर दूध, दही, तूप, मध आणि साखर या पंचामृताने शिवलिंगावर लेप देऊन धोत्रा आणि बेलाची पाने तसेच पांढरी फुले वाहून पूजा करतात. याशिवाय शिवलिंगावर चक्का थापण्याची प्रथा आजही सर्वत्र प्रचलित आहे.

महाशिवरात्रीच्या निमित्ताने भाविक उपवासाकरिता दूध आणि फळे असा आहार घेतात. तसेच नैवेद्यासाठी खीर, पंचामृत, दूध आणि दुधापासून बनविलेले विविध पदार्थ शंकराला अर्पण केले जातात. तसेच या दिवशी पूजेसाठी भस्म, रुद्राक्ष, रुद्राक्षमाला, त्रिशूल, शंकराच्या मूर्ती, शिवलिंगे, डमरू अशा विविध गोष्टी दुकानांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असतात. आजच्या महाशिवरात्री उत्सवानिमित्त महाराष्ट्रासह दक्षिण भारत, काश्मीर, ईशान्य भारत, ओरिसा, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश येथील तीर्थक्षेत्रे तसेच प्रामुख्याने बारा ज्योतिर्लिंगांच्या स्थानी मोठ्या उत्साहाने यात्रा साजरी केली जाते.

Share