‘मराठी राजभाषा दिन’

मराठी राजभाषा दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी, कादंबरीकार, नाटककार तसेच मराठी मनाचा मानबिंदु असलेले ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो.

कवी कुसुमाग्रजांचा जन्म महाराष्ट्राच्या भूमीत झाला असून त्यांनी आपल्या विलक्षण लेखणीतून प्रतिभा कौशल्याच्या आणि शब्दसामर्थ्याच्या जोरावर मराठी भाषेतून विपुल साहित्य निर्मिती करून मराठी भाषेला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. या महान साहित्यिकाने मराठी भाषेच्या प्रतिष्ठेत जी मोलाची भर घातली. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान व मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले. या त्यांच्या कार्यास अभिवादन व मातृभाषेचा गौरव म्हणून अशा या आपल्या मायबोलीतून बोलल्या जाणा-या मराठी भाषेला मोठी परंपरा लाभलेली आहे. ही भाषा अधिक संपन्न करण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक थोर संत, कवी तसेच साहित्यिकांनीही आपल्या प्रतिभासंपन्न अशा लेखणीतून ती अधिक समृद्ध केली. अशा या मराठी भाषेला दीर्घ साहित्यिक परंपरा आणि समृद्ध असा साहित्यिक वारसा लाभल्याने आज आपला मराठी माणूस जगाच्या कानाकोप-यात जाऊन पोहोचला आहे.

खरं तर आजच्या युगात बहुभाषिक असणं गरजेचं असलं तरी प्रत्येक भारतीयाने आपली मातृभाषा जोपासलीच पाहिजे. कारण ज्ञानेश्वरांनी देखील ‘माझी मराठीची बोलू कौतुके, परि अमृताहे पैजा जिंके.’ या त्यांच्या काव्य रचनेतून मराठी भाषा ही अमृतालाही पैजेने जिंकणारी आहे. शिवाय तिच्यातील गोडवा अमृतापेक्षाही अधिक असल्याचे सांगून त्यांनी मराठी भाषेचा गौरव केला आहे. म्हणूनच आपण आपल्या मायबोलीचा सदैव अभिमान बाळगला पाहिजे. आजचा २७ फेब्रुवारी हा दिवस कवी कुसुमाग्रजांना आदरांजली अर्पण करण्यासाठी दरवर्षी ‘मराठी भाषा दिन’ म्हणजेच ‘मराठी राजभाषा दिवस’ मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

Share