।। श्री रामकृष्ण परमहंस ।।

रामकृष्ण परमहंस यांचा जन्म बंगालमधील कामाटपूकर या गावी एका गरीब वैष्णव ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे बालपणही तेथेच गेले. त्यांच्या लहानपणीच वडील क्षुदिराम यांना गयेतील तीर्थयात्रेवेळी गदाधर विष्णूचे स्वप्नात दर्शन झाले होते म्हणून या बालकाचे नाव गदाधर असे ठेवण्यात आले. लहानपणी त्यांना गदा या नावाने ओळखले जात होते. वडिलांच्या निधनानंतर परिवाराची संपूर्ण जबाबदारी त्यांचे थोरले बंधू रामकुमार यांनी स्वीकारली. या घटनेचा रामकृष्णांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. वडिलांच्या नसण्याने ते आईच्या जवळ खूप आले आणि घरातील कामे तसेच देवपूजेत त्यांचे मन रमू लागले. आपल्या भावाला मदत करण्यासाठी रामकुमार यांनी पौरोहित्याचा पेशा स्वीकारून नियोजित योजनेनुसार रामकृष्णांना कलकत्त्यास घेऊन आले. ‘भात-भाकरी मिळविण्याची विद्या मला नको, तर जेणेकरून हृदयात ज्ञानाचा उदय होऊन आपले जीवन कृतार्थ होईल अशी विद्या पाहिजे.’ असे त्यांनी आपल्या भावाला सांगून लौकिक जीवनाबद्दल उदासीनता दाखविली.

दक्षिणेश्वर या कलकत्त्यापासून जवळ असलेल्या खेडेगावातील कालीमातेच्या मंदिरात रामकृष्णांनी त्यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण काळ व्यतीत केला. त्यांनी कालीमातेच्या मंदिरात पुजा-याचे काम स्वीकारून अत्यंत तळमळीने व ध्यानधारणेने कालीमातेची अत्यंत व्याकुळतेने उपासना करून तिच्या दर्शनाचा साक्षात्कार करवून घेतला. त्याचबरोबर स्वतःस हनुमान मानून प्रभू रामचंद्रांची त्यांनी आराधना केली. त्यानंतरच्या काळात त्यांनी राधाभावाने श्रीकृष्णाची देखील उपासना केली. भैरवी ब्राह्मणी या अध्यात्मिक क्षेत्रातील एका अधिकारी स्त्रीच्या मार्गदर्शनाखाली तंत्र ग्रंथातील उपासनाही त्यांनी आचरणात आणल्या.

पुढे शारदामणी यांच्याशी विवाह केल्यानंतर त्यांनी आपल्या पत्नीला जगन्माता मानूनच लौकिकार्थाने संसार केला. ‘जितकी मने तितके मार्ग, सर्वच उपासनांचे अंतिम ध्येय एकच आहे.’ असा त्यांचा उपदेश होता. शिवाय त्यांनी ईश्वराचे दर्शनही होऊ शकते परंतु सर्वधर्मसमन्वय हा त्यांचा जीवनाचा महान उद्देश होता. स्वामी विवेकानंदांसारखे युगपुरुष शोभणारे शिष्य देखील त्यांनी तयार केले.

अशा या रामकृष्णांनी तोतापुरी यांना सद्‌गुरू करून त्यांच्याकडून संन्यास दीक्षा घेऊन तीन दिवसात अद्वैत वेदांतीच्या मार्गदर्शनाखाली निर्विकल्प समाधी अवस्था प्राप्त करून घेतली.

Share