आनंद सोहळा लग्नाचा… श्री रेणुका-जमदग्नींचा !

रेणुका माहात्म्य ग्रंथातल्या कथेत सर्व अध्ययन झाल्यावर भगवान शंकर परशुरामांना म्हणाले, ‘भार्गवा, तुला अजून काही जाणून घ्यायचे आहे का?’ तेव्हा परशुराम म्हणाले, ‘हे परमेश्वरा, मला असं काहीतरी सांगा जे सर्वांना अज्ञात आहे.’ तेव्हा शंकरांनी परशुरामांना विचारले, ‘तू तुझ्या आई-वडिलांना ओळखतोस का?’ तेव्हा हसून परशुराम म्हणाले, ‘हा काय प्रश्न आहे?’ काश्मीर देशाच्या ईक्ष्वाकू कुळातील प्रसेनजित अर्थात रेणू राजा आणि त्यांची धर्मपत्नी भोगावती यांची कन्या कामेष्टी यज्ञातून प्रकट झालेली एकुलती एक कन्या म्हणजे माझी माता रेणुका, तर ब्रह्मदेवांचे मानसपुत्र असलेल्या भृगू ऋषींच्या नातवाचे अर्थात रुचिक मुनी आणि गाधी राजकन्या सत्यवती यांचे सुपुत्र म्हणजे महर्षी जमदग्नी हे माझे पिता! हे ऐकल्यावर भगवान शंकर म्हणाले, ‘बाळा, अजून तू तुझ्या माता-पित्यांना ओळखले नाहीस. तर ऐक, कोणे एके काळी संपूर्ण विश्वाचा संहार करावा म्हणून अख्खं जग मी माझ्या नेत्राग्नीने जाळून टाकत होतो. अशा प्रलयकाली माझ्या उग्र स्वरूपात कुणीही टिकून राहिलं नव्हतं. तेव्हा एक स्वरूपसुंदरी त्या अग्नीमध्ये उभी असलेली मी पाहिली. तिचे रक्षण करावे म्हणून मी तो संपूर्ण अग्नी पिऊन टाकला’. तेव्हा त्या सुंदरीजवळ जाऊन मी तिला विचारताच ती म्हणाली, ‘हे रुद्रा, मी पराशक्ती असून या विश्वाच्या आधी आणि नंतर माझे अस्तित्व आहे. तिच्या स्वरूपावरती भाळून मी तिला विवाहासाठी विचारताच तिने मला सांगितले, ‘पुढे येणाऱ्या कृतयुगात मी अग्नि संभव अशी अवताराने रेणू राजाच्या घरी जन्म घेईन, तेव्हा तू देखील भृगूकुळात अवतार घे. हा यमालाही जाळून टाकणारा अग्नी तू माझ्या प्रेमासाठी प्राशन केलास म्हणून तुला यमदग्नी किंवा जमदग्नी म्हणून ओळखला जाईल ते आम्ही तुझे माता-पिता आहोत. आज चैत्र शुक्ल पौर्णिमा. काश्मीर देशाच्या रेणू राजाच्या सुकुमार कन्येचे स्वयंवर राजाने आयोजित केले होते. स्वयंवराला काहीच पण नव्हता जो रेणुकेच्या मनात भरेल तोच तिचा पती. सभेमध्ये शेकडो राजे, ऋषी, राजपुत्र अशी अनेक मंडळी उभी होती. कुणाचेही मुखकमल न पाहता केवळ चरणांना निरखत रेणुका जमदग्नींजवळ पोहोचली. युगानु-युगे ज्या चरणात बरोबर चालत आलो तेच हे चरण! हे जाणून रेणुकेने जमदग्नींच्या गळ्यात वरमाला घातली. आपल्याला सोडून राजकन्येने ऋषीबरोबर विवाह करावा या जाणिवेने रागावलेल्या राजांचे बंड जमदग्नींनी आपल्या पराक्रमाने शांत केले. पुढे सिद्धाचलावर जमदग्नींचा आणि रेणुकेचा विवाह सोहळा पार पडला. त्याची स्मृती आजही रेणुका-जमदग्नींच्या विवाह सोहळ्याने जपली जाते. मार्गशीर्ष महिन्यात विधवा झालेली जगदंबा आज पुन्हा सुवासिनी होते तो हा मंगल दिवस! या निमित्ताने अनेक ठिकाणी रेणुका विवाहाचे आयोजन केले जाते.

।। श्रीमातृचरणारविंदस्य दास प्रसन्न सशक्तीकः ।।

Share