संत गाडगेबाबा
संत गाडगेबाबा यांचा जन्म २३ फेब्रुवारी, १८७६ रोजी अमरावती जिल्ह्यातील शेंडगाव येथे परीट घराण्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव झिंग्राजी व आईचे नाव सखुबाई असे होते. संत गाडगेबाबांना डेबूजी या नावाने ओळखले जात होते. त्यांना लहानपणापासून भजन, कीर्तनाची आवड होती आणि त्यांची वृत्तीही धार्मिक व परोपकारी होती. त्यांचे राहणीमान अत्यंत साधे असून ते अंगावर नेहमी फाटकी गोधडी व हातात गाडगे घेत असत.
ते संसारातून अलिप्त राहून तीर्थयात्रा करीत गावोगावी फिरू लागले. पुढे समाज सुधारणेसाठी व लोकशिक्षणासाठी त्यांनी कीर्तनाचे माध्यम प्रभावीपणे वापरले. परंतु ते निरक्षर जरी असले तरी त्यांची भाषा अतिशय सुबोध व सर्वसामान्यांना सहज समजेल-उमजेल अशीच होती. त्यांनी महाराष्ट्रासह सर्वच प्रांतातील गावोगावी फिरून कीर्तनाच्या माध्यमातून लोकजागृतीचे कार्यही केले. स्वच्छतेच्या बाबतीत ते अतिशय आग्रही होते. जेव्हा ते तीर्थयात्रेच्या ठिकाणी जात असत तेव्हा तेथील मंदिर परिसर स्वतः स्वच्छ करीत असत. त्यांची शिकवण अतिशय साधी असून त्यांनी समाजप्रबोधनाचे कार्यही केले. इतकेच नव्हे तर संसारात राहूनही ईश्वरभक्ती साध्य करता येते अशी शिकवणही त्यांनी समाजाला दिली.
आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून समाजातील अज्ञान, अंधश्रध्दा, अनिष्ट रूढी, परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. देव दगडात नसून तो माणसात आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठासविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी समाजातील रंजल्या-गांजलेल्यांसाठी, अनाथांसाठी ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालय आश्रम तसेच विद्यालये सुरू केली. कीर्तनाद्वारे शिक्षणाचे महत्त्व जनतेस पटवून देऊन लोकजागृती साधणारे हे एक चालते बोलते विद्यापीठच होते. संत गाडगेबाबा यांचेविषयी समाजात कमालीचा आदरभाव असून त्यांनी केलेल्या लोकजागृतीचे तसेच लोकसेवेचे कार्य अत्यंत मोलाचे ठरते. अशा या थोर आधुनिक मराठी संत व समाजसुधारकाची जयंती आजही साजरी केली जाते.