श्री शंकर महाराज

नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील अंतापूर गावापासून जवळच असलेल्या निसर्गरम्य ठिकाणी पहाटेच्या निरव शांततेत हे बालक रूपात एका शिवभक्त दाम्पत्याला मिळाले. पुढे या दाम्पत्याने या बालकाचे संगोपन करून त्याचे नाव शंकर असे ठेवले. हेच ते श्री शंकर महाराज होय.

शंकर महाराजांनी ‘आपण प्रत्यक्ष कैलासहून आलो असून या पृथ्वीतलावर भक्तीचा मळा फुलवायला आलो आहोत’ असा उच्चार केला. परंतु त्यांचे बोलणे बोबडे व कोणालाही चटकन लक्षात न येणारे असे होते. प्रथमदर्शनी ते एखाद्या वेड्यासारखे दिसत व इकडे-तिकडे पाहून स्मित हास्य करीत असत. अशा या शंकर महाराजांना नाम नाही, रूप नाही, एक स्थान नाही ते कोणत्याही स्थानी एकाच वेळी नसत. कधी ते त्रिवेणी संगम, सोलापूर, अक्कलकोट, त्र्यंबकेश्वर, नाशिक, नगर तर कधी पुणे, हैद्राबाद, तुळजापूर, औदुंबर, श्रीशैल्य अशा अनेक ठिकाणी त्यांची भटकंती चालूच असायची. ते अध्यात्मयोगी व सिध्द अवलिया सत्पुरुष असून ते आपल्या भक्तांना ‘सिद्धीच्या मागे लागू नका’ असे नेहमी सांगत असत. परंतु आपल्या योगसामर्थ्याने भक्तांना कळत-नकळत आपली प्रचिती आणून देत असत. शिवाय ते आपल्या भक्तांना स्वामी समर्थ आपले सद्‌गुरु असल्याचे सांगून त्यांचे नित्य स्मरण करा व त्यांची भक्ती हीच माझी खरी भक्ती होय.

श्री शंकर महाराजांना ज्ञानेश्वरीतील प्रत्येक ओवी न ओवी मुखोद्गत असे. अशा या शंकर महाराजांची योग्यता विद्वान मंडळी जाणून होते. ते नेहमी सर्वांशी समभावाने वागत असत. महाराजांच्या या अमृतमय स्पर्शाचा आनंद अनेक भक्तांना त्यांच्या अनुभूतीतून मिळाला आहे. अखेरीस महाराजांनी वैशाख शुद्ध अष्टमीला समाधी घेऊन पुणे येथे आपले अवतार कार्य संपविले.

Share