श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

‘तुम्ही नाम घ्यायला लागा, भगवंताचे प्रेम येईलच’

ज्या माणसाला आपला स्वार्थ साधायचा नाही, त्याला कमी पडणे शक्यच नाही. जिथे निःस्वार्थीपणा आहे तिथे भगवंताला पुरवठा केलाच पाहिजे. आपण जगावर प्रेम केल्याशिवाय परत प्रेम मिळणार नाही. जो भगवंताच्या प्रेमात तल्लीन झाला, त्याला बाकीच्या गोष्टींची आठवण राहत नाही. ज्याप्रमाणे मालक घरात आला की चोर पळालाच म्हणून समजा, त्याचप्रमाणे जो भगवंताच्या प्रेमात रमला तो खात्रीने सुखी बनला; कारण त्याची देहबुध्दी पळून जाते. म्हणून भगवंताला अशा प्रेमाने आळवावे, की त्याच्या डोळ्यांत पाणी यावे. आळवताना आपल्या डोळ्यांत पाणी आले की, भगवतांच्या डोळ्यांत पाणी येते.

प्रत्येकाने रामनामाचीच कास धरावी ही शिकवण देणारे प. पूज्य ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज १९ फेब्रुवारी, १८४५ रोजी बुधवारी सकाळी ९.३० च्या दरम्यान गोंदवले गावात जन्मले. महाराजांचे व्यक्तिमत्त्व प्रभावी होते. रूंद चेहरेपट्टी, भव्य कपाळ, सरळ नाक व तेज असलेले डोळे, पिवळसर झाक असलेला गोरा रंग असे त्यांचे तेजस्वी रूप होते. महाराजांच्या चेह-यावर मंद स्मित असे. प्रत्येक माणसावर त्यांची सहज छाप पडे. गोंदवले येथील श्रीराम मंदिरात श्रीरामासमोर आजदेखील एक कोच आहे. त्या कोचावर ते बसलेले असत. त्यांना घरी ‘गणपती’, ‘गणू’ असे संबोधित, तर गावातील लोक त्यांना ‘गणूबुवा’ असे म्हणत. उत्तर भारतातील लोक त्यांना आदराने गणूबुवा असे म्हणत. महाराजांचे गुरू श्री तुकामाई होते. ते त्यांना ‘माझा बाळ’ म्हणत. भक्त व शिष्य त्यांना महाराज म्हणत. महाराज स्वतःला ब्रह्मचैतन्यबुवा रामदासी असे स्मरून तशीच सही करीत. वयाच्या १२ व्या वर्षांपासून त्यांनी पुष्कळ प्रवास केला. ते पट्टीचे पोहणारे होते. त्यांना लहान मुलांची खूप आवड होती. ते कविता रचत असत तसेच त्यांना गायनाची आवड होती. ते नामस्मरणात व एकांतात रमत असत. श्रीमंत आणि विद्वान लोकांपेक्षा ते अडाणी व खेडवळ लोकांमध्ये रमत. ते नेहमी म्हणत असत की, ‘प्रपंचामध्ये निष्कपट प्रेम करायला शिकणे, ही भगवंतावर प्रेम करायला शिकण्याची पहिली पायरी आहे.’ ते उत्तमप्रकारे भक्तीचे, भगवंताच्या प्रेमाचे व नामाचे, तसेच संतांच्या वागणुकीचे स्पष्टीकरण देत असत, अशा वेळी सहजपणे ते दृष्टांत बोलून जात. ते जसे भक्तांना गोंजारत, तसेच ते खडसावूनही बोलत असत. महाराजांनी प्रापंचिक लोकांचे कष्ट, दुःख, हालअपेष्टा जाणून घेतल्या व त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी, भगवंताकडे वळविण्यासाठी आपल्या वाणीची सर्वशक्ती पणाला लावली. लहान-सहान गोष्टींमधून महाराज माणसांची परीक्षा करीत असत व तो जीवनात कसा व कोठे आहे, याची त्याला प्रचिती आणून देत असत. रात्रंदिवस त्यांनी प्रापंचिक लोकांशी जवळीक करून त्यांना रामनामाकडे वळवून मार्गाला लावले, पण कधीही कोणाकडून कसलीही वर्गणी किंवा पैसे घेतले नाहीत. कधी ते सांगत, ‘मी जंगम आहे, मी पंढरीचा वारकरी आहे’, तर कोणाला सांगत, ‘मी रामदासी आहे.’ एखाद्या माणसाला त्यांनी जवळ केले की, त्याचे सर्व काही ते सोसत असत. ते म्हणत, ‘प्रत्येकाने जीवनाला उंची आणि व्यापकता आणून शेवटपर्यंत हौसेने जीवन जगत राहिले पाहिजे. त्यामध्ये भगवंताच्या नावाचा ध्यास पाहिजे. शेवटचा श्वास जाईपर्यंत भगवंताच्या नावाचा ध्यास पाहिजे. शेवटचा श्वास जाईपर्यंत भगवंताच्या नामाला सोडता कामा नये.’

स्त्रियांबद्दल त्यांना फार आदर असे. स्त्रिया निःस्वार्थी असतात. संसारासाठी त्या खस्ता खातात व स्त्रियांनीच आत्तापर्यंत धर्म टिकवून ठेवला आहे. तसेच ज्या घरातील स्त्रिया सुज्ञ असतात, ती घराणी चांगली असतात असं ते नेहमी म्हणत. आईच्या प्रेमाविषयी जेव्हा ते बोलत, तेव्हा त्यांचा गळा भरून येई व डोळ्यांत पाणी येत असे. आई म्हणजे भगवंताच्या प्रेमाची प्रापंचिक मूर्ती होय. स्त्रियांचे अंतःकरण जात्यासारखं शुध्द व श्रध्दायुक्त असल्याने भगवंताचा मार्ग त्यांना सोपा आहे असे ते सांगत. त्यांच्याकडे आलेल्या माणसाला जसे ते भगवंताचे नाम मुक्तपणाने वाटत तसेच प्रेमाने वाढलेला रामाचा प्रसाद भाजी-भाकरी, आमटी हा मंदिरामध्ये येणा-या प्रत्येकाने खाल्ला पाहिजे, असे त्यांचे म्हणणे असे. पंढरीचे वारकरी व दिंड्या मंदिरात मुक्काम करून भक्ती व प्रसाद ग्रहण करून पुढे जात असत.

‘जय जय श्रीराम, जय जय श्रीराम’ असे मोठ्याने म्हणण्याचा प्रघात महाराजांनी चालू केला, त्यामुळे भक्तलोक कोणतेही काम असताना ‘जय जय श्रीराम’ म्हणत असत. महाराजांनी ‘राम’ नावाचा ध्यास लोकांना शिकवून गोंदवल्यात श्रीरामाच्या अयोध्येचे वातावरण निर्माण केले. सामान्य स्त्री-पुरुषास सहजासहजी भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव होत नाही, हे कठीण काम महाराजांनी रामरायाला साक्षात गोंदवल्यात आणून उभा केला. नुसता उभा केला नाही तर त्याच्यावर स्वतः इतके प्रेम केले की ते नैमिषारण्यात जाण्यास निघाले त्या वेळी रामाच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले. ते भक्तांना मोठ्या प्रेमाने सांगत, ‘अरे, माझ्या रामाला एकदा डोळे भरून पहा आणि नंतर घरी जा.’ मंदिरात असलेला राम केवळ मूर्ती नसून प्रत्यक्ष परमात्माच आहे याच भावनेने ते स्वतः वागत असत व याच भावनेने ते प्रत्येक स्त्री-पुरुषास उपदेश करीत. जगात घडणा-या प्रत्येक गोष्टीमध्ये रामाचीच इच्छा काम करीत असल्याचे त्यांना दिसे व व्यावहारिकदृष्ट्या योग्य प्रयत्न केल्यास जे चांगले-वाईट फळ मिळते, ते रामाच्या इच्छेनेच मिळते, अशी श्रध्दा ठेवण्यास ते सर्वांना सांगत असत. ज्यांच्यापाशी अशी श्रध्दा असते त्यांना सुख-दुःखाची बाधा होत नाही, हे त्यांनी दाखवून दिले. ‘कर्ता-करविता राम आहे, त्यामुळे आपण ‘मी पणा सोडला पाहिजे’, हे लोकांच्या मनावर ठसविण्यासाठी आयुष्यभर त्यांनी श्रीरामांना लोकांसमोर आणले.

प्रत्येक माणसात भगवंताकडे जाण्यास उपयोगी पडणारा एक गुण असतो. या गुणाचा उपयोग करून व त्याचा विकास करून भगवंताकडे कसे जावे? हे प्रत्येकाला शिकवत असत. वेदांताची प्रमेये किंवा भगवंताची निष्ठा रोजच्या प्रापंचिक जीवनात उतरली पाहिजेत, यावर त्यांचा कटाक्ष होता. ‘परमार्थ हा प्रपंचात मिसळला पाहिजे आणि ज्या प्रपंचात राम नाही, त्या प्रपंचात आराम नाही’ असे ते भक्तांना सांगून पटवून देत असत. प्रत्येकाला भगवंताच्या निष्ठेचे व नामाचे महत्त्व कळले पाहिजे, या एकाच ध्येयाने त्यांनी जन्मभर परमार्थाचे अखंड चिंतन केले व इतरांच्याकडून करवून घेण्याचा प्रयत्न केला. परमार्थातील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडे येणा-या कोणालाही त्यांनी अव्हेरले नाही. निंदक, व्यसनी कोणीही येऊ दे, ते त्यांच्याशी प्रेमाने वागत. या त्यांच्या वागण्याचा व त्यांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव असा लोकांवर पडे आणि ते त्यांना वश होऊन परमार्थाच्या मार्गाचे पाईक होत असत.

नुसता प्रपंच करणे हे मनुष्यधर्माचे ध्येय नाही. जनावरेदेखील आपला प्रपंच करतात. मनुष्याने भगवंताची उपासना करून त्याची प्राप्ती करून घेतली पाहिजे, तरच प्रपंचातील कष्टाचे सार्थक होते. सद्याच्या परिस्थितीत उपासना करण्यास नामासारखा सोपा उपाय नाही, म्हणून प्रत्येकाने नामाचीच कास धरावी, हेच त्यांच्या शिकवणीचे सूत्र होते. हे तत्त्व त्यांनी स्वतः पूर्णतः आचरणात आणून मगच लोकांना सांगितले. इ.स. १९१३ साली गोंदवल्यात त्यांच्या आयुष्यातील शेवटचा रामनवमीचा उत्सव पाच हजार लोकांच्या उपस्थितीत त्यांनी साजरा केला. प्रत्येकाच्या पाठीवर हात फिरवून त्यांनी सांगितले, ‘बाळ भगवंतांनी प्रपंचामध्ये ज्या स्थितीत आपल्याला ठेवले आहे, तिच्यामध्ये समाधान मानावे आणि त्याच्या नामाला कधीही विसरू नये. जो नाम घेईल, त्याच्यामागे राम उभा आहे. नाम घेणा-याचे राम कल्याण करतो, एवढे माझे सांगणे शेवटपर्यंत विसरू नका.’

अशा त-हेने महाराजांनी जन्मभर काया-वाचा-मनाने जगात एका नामाशिवाय दुसरे काही सत्य मानलेच नाही. २२ डिसेंबर, १९३३ रोजी सोमवारी सूर्योदयाच्या सुमारास महाराजांनी देह ठेवला, परंतु आजसुध्दा गोंदवल्यात भक्तांना महाराजांचे अस्तित्व जाणवते. गोंदवले हे महाराजांच्या वास्तव्याने पुनीत झालेले श्री क्षेत्र सातारा जिल्ह्यात असून तेथे जाऊन भक्त आपल्या जीवनातील काही काळ घालवितात. श्रीसमर्थ सद्‌गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने असलेला ग्रंथ संग्राहक गो. सी. गोखले यांनी प्रकाशित केलेला आहे. त्यामध्ये महाराजांची प्रवचने व विचार सांगितलेले आहेत. त्या ग्रंथामध्ये तारखेप्रमाणे वाचन करण्यासाठी त्या दिवशी त्या ग्रंथातील एक पान वाचावे व मगच कामास सुरुवात करावी, याकरिता महाराजांचे विचार सांगितलेले आहेत. हा ग्रंथ प्रत्येकाने स्वतःजवळ ठेवावा इतकेच सांगणे आहे.

Share