आधुनिक राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज

अमरावती जिल्ह्यातील यावली या गावी ३० एप्रिल, १९०९ साली तुकडोजींचा जन्म झाला. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. जन्मतःच ते निवाराहीन झाले होते. परंतु याच तुकडोजींनी पुढे सेवाग्रामात अनेक मंदिरे व निवारे उभी करून गोरगरीबांना निवारा उपलब्ध करून दिला. त्यांचे पाळण्यातील नाव माणिक होते. पुढे हे नाव त्यांचे गुरू आडकोजी महाराज यांनी बदलून तुकडोजी असे केले. बालवयातच त्यांना संतत्वाची आणि कवित्वाची दीक्षा मिळाली होती. परंतु तुकडोजींचे शिक्षणात लक्ष नसल्याने ते शाळेऐवजी मंदिरात, मठात किंवा गुराख्यांच्या संगतीत रमत असत.

याच तुकडोजींनी आपल्या ग्रामगीतेतील लेखनाव्दारे आपल्या आयुष्यातील जीवन कार्यातील महत्त्वाचा टप्पा गाठला होता. याचबरोबर त्यांनी मराठीप्रमाणेच हिंदी भाषेतही विपुल साहित्य लेखन केले होते. या ग्रामगीतेव्दारे समाजातील अंधश्रद्धा आणि जातीभेद निर्मूलन करण्याचे कार्यही त्यांनी आपल्या भजन-कीर्तनाद्वारे प्रभावीपणे केले. तसेच त्यांनी ग्राम हे सुशिक्षित व्हावे, सुसंस्कृत व्हावे तसेच ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळावे यासाठी अविरत प्रयत्न केले. आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी आपल्या प्रभावी खंजिरी भजनाच्या माध्यमातून आध्यात्मिक, सामाजिक तसेच राष्ट्रीय पातळीवर प्रबोधनाचे कार्यही केले. याशिवाय ग्राम विकासाच्या विविध समस्यांचा मूलभूत विचार करून त्या समस्या कशा सोडवाव्यात यावर उपाययोजना देखील केल्या. अशा या संपूर्ण गोष्टीतून त्यांचे द्रष्टेपण आपणास दिसून येते. या तुकडोजींनी राष्ट्राच्या जागृतीसाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले होते. अशा या तुकडोजींना राष्ट्रपतींनी त्यांचे खंजिरी भजन ऐकून त्यांना ‘राष्ट्रसंत’ म्हणून संबोधले होते.

समाजावरील प्रेमामुळे व देवावरील उत्कट भक्तीमुळे आपल्या शारीरिक वेदना आनंदाने त्यांनी सहन केल्या. अखेरीस ११ ऑक्टोबर, १९६८ रोजी सूर्य अस्ताला गेला तो महाराजांची प्राणज्योत आपल्या बरोबर घेऊनच. पण ब्रह्मलीन झालेला महाराजांचा तो अमर आत्मा कडाडणा-या खंजिरीवर नादब्रह्मात तल्लीन होऊन जणू गात होता.

‘’इस लोक की यात्रा हमारी सफलता से हो गयी,

इच्छा अनिच्छा कुछ नही, गुरुदेव की मर्जी रही.’’

Share