भवानी देवीच्या उत्पत्ती विषयी माहिती !

आज चैत्र शुद्ध अष्टमी
अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी असणाऱ्या भवानी जगदंबे चा प्रगट दिन!
कोणे एकेकाळी कृत युगात दंडकारण्यात यमुनाचल पर्वतावर कर्दम नावाचे ऋषी आपली पत्नी अनुभूती सह रहात होते. अनुभुती गर्भवती असतानाच कर्दम ऋषींचा देहांत झाला. पोटात मूल असल्याने सती न जाता अनुभुती तपस्विनी म्हणून जीवन जगत होती. मुलाला जन्म देऊन ती पुन्हा तपात निमग्न झाली. तीचं अलौकिक सौंदर्य पाहून कुक्कुर नावाचा दैत्य तीला त्रास देऊ लागला. तेव्हा अनुभुती ने कळवळून आदिशक्ती जगदंबेला हाक घातली. भक्तावरचे संकट फेडायला आई जगदंबा त्वरीत म्हणजे घाईघाई धाऊन आली म्हणून तीला त्वरिता / त्वरीजा असं नाव मिळालं याचाच अपभ्रंश झाला तुळजा ! ( श्रीविद्या संप्रदायात अष्टमीची नित्या म्हणजे त्वरीता म्हणजे आजच्या तिथीची देवता)‌. आईने अष्टभुजा रुपात असुराशी. युद्ध सुरू केले कुक्कुरासुर रेड्याच्या रूपात धाऊन आला आईने त्याच मस्तक उडवल रेड्याच्या शरीरातून दैत्य बाहेर आला. जगदंबे न त्रिशुळाने त्याच्या छातीचा वेध घेतला आणि अनुभुती ला संकटमुक्त केलं.
हे एवढ कार्य करून आदिशक्ती ची लिला संपली नाही. रेणुका अवतारात तीने परशुरामांला वचन दिले होते की पुढच्या अवतारात तुला पुन्हा भेटेन. एव्हाना कृत युग संपून त्रेता युग सुरू झाले होते. भगवान विष्णू रघुकुळात दशरथ पुत्र श्रीराम म्हणून अवतीर्ण झाले. पितृवचनाच्या पालनासाठी प्रभू लक्ष्मण आणि जानकी सह वनवासाला निघाले पंचवटी मुक्काम असताना रावणाने सीताहरण केले प्रभू राम सीता विरहात व्याकुळ होऊन दंडकारण्यात फिरू लागले हे बघून भगवान शंकर देखील व्याकुळ झाले तेव्हा जगदंबेने शंकरांना कारण विचारताच त्यांनी रामरायाची व्याकुळता सांगताच देवीने रामरायाची परिक्षा घ्यायच ठरवल. ती सीतेचं रूप घेऊन घाटशीळेवर उभी राहीली तिला उभी पाहून रामचंद्र धावत आले. सीता रुप पार्वतीला वाटले आपण जिंकलो तीने आनंदभरात डोळे मिटून घेतले. त्याच क्षणी तिला चरणांवर उष्ण ओलावा जाणवला तीने डोळे उघडून पाहताच रामराया चरणावर नतमस्तक झालेला पाहिला . देवीने पाहताच त्याने विचारले तु का आई इथे ? तेव्हा नाव प्रचलित झाले तुकाई . रामाने तिचा उद्देश जाणून म्हणले आई खरच वेडी आहेस तेव्हा नाव आले येडाई. तीच्या या रुपाला पाहून भगवान शंकर नतमस्तक झाले अशी जगाची आई म्हणजे भवाची आई म्हणून ती भवानी किंवा भव म्हणजे शंकर त्यांची स्वामिनी अर्थात भवानी. अशी ही जगन्माता अष्टभुजा जगतजननी आई त्वरिजा भवानी अर्थात भक्तांसाठी वेडी येडाई अशी तुळजापूर वासिनी. अशा आदिशक्ती ला प्रगटदिनानिमित्त अभिवादन !
श्रीमातृचरणारविंदस्यदास प्रसन्न सशक्तीक:

Share

Comments (406)