।। वटपौर्णिमा ।।

पद्म पुराणानुसार वटवृक्षाला भगवान विष्णुचे रूप मानले जाते आणि म्हणूनच कुठल्याही पौर्णिमेला भगवान विष्णूची पूजा केली जाते. शतकानुशतके जगण्याच्या क्षमतेमुळे वटवृक्षाला हिंदू धर्मात पूजले जाते आणि त्याला देवाचे आश्रयस्थान मानले जाते. वटवृक्षाखाली सात दिवस बसल्यावर गौतमबुद्धाला ज्ञान प्राप्त झाले, असे म्हणतात.

हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा करतात. निसर्गतःच दीर्घायुषी असणा-या वृक्षाचे संवर्धन आणि जतन व्हावे, या हेतूने या वृक्षाची पूजा करण्याची प्रथा भारतीय संस्कृतीने स्वीकारली असावी. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे व दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. सर्व पवित्र वृक्षात वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही खूप होतो. अशा वटवृक्षाची स्त्रिया मनोभावे पूजा करून आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य, विस्तारीत प्रपंच यासाठी प्रार्थनादेखील करतात.

सावित्रीने वडाच्या झाडाखालीच सत्यवानाचे प्राण परत मिळविले, अशी पौराणिक आख्यायिका असल्याने वटसावित्रीचे पारंपरिक व्रत केले जाते व वडाच्या झाडाची पूजा केली जाते. पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीने देखील वडाच्या झाडाला विशेष महत्त्व असल्याने त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे, हा देखील पूजेचा एक हेतू मानावयास हरकत नाही.

वटसावित्रीचे व्रत हे सौभाग्यव्रत आहे. सात जन्म हाच पती मिळावा. असा अर्थ यात अभिप्रेत नाही, तर सौभाग्य म्हणजे पती, धनधान्य, ऐश्वर्य, आरोग्य, पुत्रपौत्र इत्यादी अर्थ अभिप्रेत आहे. थोडक्यात म्हणजे समृद्धता यावी यासाठी प्रत्येक स्त्री हे व्रत करत असते. या वर्षी वटपौर्णिमा ३ जून रोजी आहे. वटवृक्षाची पूजा करताना, वृक्षाच्या फांद्या तोडून आणून त्याची पूजा करणे, हा चुकीचा पायंडा पडत आहे. वृक्ष संवर्धनाच्या हेतूने या चुकीच्या प्रथेला आळा बसून निसर्ग संवर्धनाच्या दृष्टीने योग्य पावले उचलणे. हे आपले समाजाप्रती कर्तव्य आहे आणि म्हणूनच पारंपरिकता आणि आधुनिकता याचा योग्य मेळ घालून निसर्गाची जोपासना करायचा संकल्प करू या !

Share