जागतिक मुद्रण दिन

२४ फेब्रुवारी रोजी मुद्रण कलेतील जनक जोहान्स गुटेनबर्ग यांच्या जन्मदिनाप्रित्यर्थ साजरा करण्यात येणारा हा दिवस ‘जागतिक मुद्रण दिन’ म्हणून ओळखला जातो. सर्वप्रथम मुद्रण पद्धतीचा शोध हा चीनमध्ये लावला गेला. त्या काळात उपकरणाचे साधन म्हणून कागद, शाई आणि मुद्रण प्रतिमा वापरली जात असे. कोरीव मजकुरावर शाई लावून त्यावर ओलसर कागद ठेवून मुद्रणाचा ठसा उमटवला जात असे. यामध्ये धार्मिक मजकूर लिहिले जात असत. जर्मनीतील गुटेनबर्ग यांनी सर्वत्रप्रथम अक्षराचे सुटे खिळे बनविण्याचा तसेच टाईपसह छपाई यंत्राचा शोध देखील लावला. इ.स.१४३४ ते १४३९ या कालखंडात मुद्रण क्षेत्राला अधिक महत्त्व प्राप्त झाले. या काळातच धात्वलेखी मुद्रणाचा शोध लावला गेला. परंतु या पद्धतीमध्ये खूप तांत्रिक अडचणी येत गेल्या.

भारतामध्ये १५५६ साली सर्वप्रथम मुद्रण कला आली आणि त्यानंतर महाराष्ट्रात ही कला १८८२ साली आली. या काळात अमेरिकन मिशनने या मुद्रणाची सुरुवात करून देवनागरी लिपीचे खिळे आणले. याच मुद्रणालयात काम करणारे टॉमस ग्रॅहम यांनी देवनागरी आणि गुजराती लिन्यांचे साचे बनवून मातृका तयार केल्या. यानंतर अमेरिकन मिशनने तंत्राची निर्मिती करून पंचांग छपाई केली. तसेच त्यांनी अक्षर मुद्रणालयही सुरू केले. अशा रितीने मुद्रण कलेचा विकास झाल्यावर संगणकाद्वारे हे मुद्रण तंत्र अधिक विकसित झाले. कालांतराने इंटरनेट तसेच मीडियाचाही विकास झाला. मुद्रण कलेच्या या शोधामुळेच आज आपण वैचारिकदृष्ट्या समृद्ध आहोत. तसेच सोशल मीडिया या क्षेत्रात आपण केलेली प्रगतीही आजच्या मुद्रण कलेचा उत्तम नमुना म्हणावयास हरकत नाही. त्यामुळे आजच्या जागतिक मुद्रण दिनाचे औचित्त्य साधून त्या सर्व संशोधकांच्या कार्याला सलाम!

Share